Mumbai Local Megablock : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर ९ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्ती कामांमुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल होतील, अनेक फेऱ्या रद्द होतील किंवा विलंबाने धावतील. प्रवाशांनी प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्ग वापरावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai Local Megablock : प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
mumbai local
| Updated on: Nov 09, 2025 | 9:05 AM

मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती, देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही रेल्वे मार्गांवर आज रविवारी ०९ नोव्हेंबर २०२५ मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज लोकलच्या वेळापत्रकात मोठे बदल पाहायला मिळणार आहे. या काळातअनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील किंवा विलंबाने धावतील. प्रवाशांनी या वेळेत प्रवास टाळावा किंवा पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक काय?

मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३६ ते दुपारी ०३.१० वाजेपर्यंत ब्लॉक राहील. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा स्थानकावरून डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच ते त्यांच्या गंतव्य स्थानकांवर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

तर दुसरीकडे, अप जलद मार्गावर सकाळी ११.०३ ते दुपारी ०३.३८ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ठाण्यातून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावरून अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यानच्या सर्व स्थानकांवर थांबून प्रवास करतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावरून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्याही गंतव्य स्थानकांवर सुमारे १५ मिनिटांच्या विलंबाने पोहोचतील.

हार्बर मार्गावरील स्थिती काय?

हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ०४.१० वाजेपर्यंत पाच तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉकच्या कालावधीत लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहणार आहे. CSMT येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ०३.३६ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ०३.४७ या वेळेत CSMT कडे येणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी, ब्लॉकच्या काळात CSMT – कुर्ला आणि पनवेल – वाशी या विभागांदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. तसेच, हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ठाणे – वाशी/नेरूळ ट्रान्स-हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची विशेष परवानगी असेल.

पश्चिम रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक समोर

तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.०० ते दुपारी ०३.०० वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत, अप आणि डाउन धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. वळवलेल्या गाड्यांपैकी काही गाड्या विलेपार्ले आणि राम मंदिर या स्थानकांवर थांबणार नाहीत. अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. तर काही बोरिवली आणि अंधेरीहून सुटणाऱ्या गाड्या गोरेगाव येथे शॉर्ट-टर्मिनेट केल्या जातील. प्रवाशांनी धीम्या मार्गावरील लोकलमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन प्रवास करावा.

दरम्यान रेल्वेच्या कामांमुळे मुंबईकरांची गैरसोय होणार आहे, त्याबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा आणि आपल्या प्रवासासाठी पुरेसा वेळ घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.