प्लॅटफॉर्मवरच रक्तरंजित सडा… प्राध्यापकाला भोसकले… सीसीटीव्हीत थरार कैद; मुंबई हादरली
मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकावर लोकलमधून उतरताना झालेल्या धक्क्यावरून एका प्राध्यापकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी १२ तासांच्या आत आरोपी ओंकार शिंदेला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलची गर्दी आणि त्यातून होणारे वाद नवे नाहीत. मात्र एका किरकोळ धक्क्याचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची थरारक घटना मालाड रेल्वे स्थानकावर घडली आहे. विलेपार्ले येथील नामांकित एन.एम. (NM) महाविद्यालयातील ३१ वर्षीय तरुण प्राध्यापक आलोक सिंह यांची एका मद्यधुंद प्रवाशाने धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आलोक सिंह हे विलेपार्ले स्थानकातून लोकल पकडून मालाड येथे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. मालाड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ट्रेन आली होती. त्यावेळी उतरण्याच्या घाईत आलोक सिंह यांचा धक्का दरवाज्यात उभा असलेल्या ओंकार शिंदे (२७) याला लागला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार शिंदे हा मद्यधुंद अवस्थेत होता. या वादाचे रुपांतर इतक्या टोकाच्या रागात झाले की, ओंकारने आपल्याजवळील धारदार शस्त्र काढले आणि थेट आलोक सिंह यांच्या पोटावर खुपसले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आलोक सिंह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली
या हत्येनंतर आरोपी ओंकार शिंदे गर्दीचा फायदा घेऊन स्थानकाबाहेर पसार झाला होता. या घटनेमुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. स्थानकातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी पळून जाताना स्पष्टपणे दिसून आला. यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत ओंकार शिंदेला वसई रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. तो मालाड येथील कुरार व्हिलेजचा रहिवासी असून, त्याचा कोणताही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दरम्यान आलोक सिंह हे एन.एम. महाविद्यालयात गणिताचे (Maths) प्राध्यापक होते. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक वर्तुळात आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ ३१ वर्षांच्या एका हुशार प्राध्यापकाचा अशा क्षुल्लक वादातून बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. सध्या आरोपीला बोरिवली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी केवळ धक्क्याचा राग की आणखी काही कारण होते याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
