Mumbai Marine Drive Accident : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर बाईकचा भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात तीन दुचाकींच्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय जळगाव आणि वसई येथे झालेल्या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला असून राज्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे.

Mumbai Marine Drive Accident : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर बाईकचा भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू
marine drive accident
| Updated on: Apr 27, 2026 | 9:38 AM

Mumbai Marine Drive Accident : मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात आज पहाटेच्या सुमारास थरकाप उडवणारा अपघात घडला. गिरगाव चौपाटीजवळ तीन दुचाकींची एकमेकांना भीषण धडक बसली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यात ३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकासह एक तरुण आणि तरुणी अशा एकूण तीन जणांचा समावेश आहे. मुंबईसह राज्याच्या विविध भागात झालेल्या भीषण अपघातात एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला आहे.

मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर अपघात

मुंबईची ओळख असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात आज पहाटे ५.४५ च्या सुमारास एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. गिरगाव चौपाटीजवळ एक स्पोर्ट्स बाईक आणि दोन स्कूटी यांच्यात जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की या तिन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये एका ६०-६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह, एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे.

ही धडक इतकी वेगवान आणि भीषण होती की तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. हा अपघात ओव्हरस्पीडमुळे झाला की अन्य काही तांत्रिक कारणांमुळे, याचा तपास सध्या सुरू आहे.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळाचे पंचनामे केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

जळगावात भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले

जळगाव शहरातील मानराज पार्क चौफुलीवर एका भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली. ओम सुनील गिरी (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर ओमच्या आई आणि बहिणीने घटनास्थळी मोठा आक्रोश केला. हा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या ठिकाणच्या वाढत्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मानराज पार्क चौफुलीवर तात्काळ स्पीड ब्रेकर आणि सिग्नल बसवण्याची मागणी केली आहे.

वसईत पादचाऱ्याचा अंत

पालघरमधील वसई येथे रविवारी रात्री ९ च्या सुमारास एका भंगार भरलेल्या ट्रकने पादचाऱ्याला चिरडले. धुमाळ नगर येथील वजन काट्यासमोरून जात असताना बिंदर रामनारायण प्रजापती (वय ५५) यांच्या अंगावर ट्रक चढला. दोन्ही पायांवरून गाडी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत संताप व्यक्त केला. या परिसरात वजन काट्यामुळे अवजड वाहनांची नेहमीच रहदारी असते, तरीही उपाययोजना केल्या जात नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Follow Us