मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील ट्रायडेंट हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ
ही महिला पेडर रोडवरील चेलाराम हाऊस परिसरात राहते. ही मृत महिला हाॅटेलमध्ये कधीपासून राहत होती? तिच्याबरोबर इतर कोणी होतं का? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

Mumbai Trident Women Dead Body : मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध ट्रायडेंट हॉटेलमध्ये एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह ट्रायडेंट हॉेटेलच्या 27 व्या मजल्यावर आढळला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये देश-विदेशातील लोक राहण्यासाठी येतात. आता मरीन ड्राईव्हच्या ट्रायडेंट हॉटेलच्या २७ व्या मजल्यावर एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. विनती मेहतानी असे या महिलेचे नाव आहे. ही महिला २७ व्या माळ्यावर एका खोलीत राहत होती.
आज नेहमीप्रमाणे ट्रायडेंट हाॅटेलचे कर्मचारी रुम सर्विससाठी गेले होते. मात्र ही महिला दरवाजा उघडत नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मास्टर चावीने खोलीचा दरवाजा उघडला. यावेळी ती महिला मृताव्यस्थेत आढळली. यानंतर संबंधित हॉटेल प्रशासनाने तातडीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली.
काहीही संशयास्पद आढळलेले नाही – पोलीस
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला पेडर रोडवरील चेलाराम हाऊस परिसरात राहते. ही मृत महिला हाॅटेलमध्ये कधीपासून राहत होती? तिच्याबरोबर इतर कोणी होतं का? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात
तसेच पोलीस तपासात ही मृत महिला ही आजारी असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच तिची आईदेखील आजारी होती. याच तणावात ती होती का, असा प्रश्न विचारला जात आहे. या तपासात आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणाची अधिक तपास पोलिस करत आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे.