
“एक नवीन तरुण अध्यक्ष देऊन एक मोठा संदेश देण्याचं काम भाजपकडून होत आहे. मोठ्या प्रमाणात जेनझी सुद्धा भाजपला पाठिंबा देताना दिसत आहेत. गेल्या 11 वर्षात या देशाचा विकास झाला आहे. आज भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. येणाऱ्या दोन ते तीन वर्षात तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. आपल्या तरुणाईला आपल्या देशाचा अभिमान वाटावा अशी कामगिरी मोदी सरकारकडून झाली आहे” असं मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम म्हणाले. महापौर पदावर भाजप कुठली तडजोड करणार नाही का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. “कुठलीही तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. महायुतीला 118 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी भाजप, शिवसेना, रिपाई महायुती भक्कम आहे. आमच्यात गट स्थापन, गट रजिस्ट्रेशन यावर चर्चा सुरु आहेत. भाजप, शिवसेना, रिपाईच्या 118 नगरसेवकांपैकी एक नगरसेवक किंवा नगरसेविका जसं आरक्षण असेल तस तो त्या पदावर विराजमान होईल” असं अमित साटम म्हणाले.
मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय दिल्लीत होणार, यावर अमित साटम म्हणाले की, “मी आणि राहुल शेवाळे आम्ही जरुर भेटणार आहोत. पण गट स्थापना, गट नेता, गटाचं रजिस्ट्रेशन अशा तांत्रिक गोष्टी ज्या आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी भेटणार आहोत” बीएमसीतील स्थायी समितीवर भाजपं दावा करणार या प्रश्नावरही अमित साटम यांनी उत्तर दिलं. “भाजपचा कार्यकर्ता कधीही कुठलही अधिकाराचं, सत्तेच स्थान मिळवण्याकरता काम करत नाही. समाजात उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्यासाठी काम करतो” असं अमित साटम यांनी सांगितलं.
महापौर कोणाचा होणार?
भाजपचाच महापौर होईल का? यावर अमित साटम यांनी उत्तर दिलं. “तडजोड करण्याचा विषयच नाही. शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीला 118 जागा मिळाल्या आहेत. महापौर भाजपचा होईल की शिवसेनेचा हे महत्वाचं नाही” “मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाररहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास घडवणं हे महत्वाच आहे. कुठल्या एका पक्षाला महापौरपद मिळण्याइतपत ही छोटी निवडणूक नाही. भविष्याच्या पिढ्यांच रक्षण करणारी ही निवडणूक होती. महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आहोत” असं अमित साटम म्हणाले. या पत्रकार परिषदेत अमित साटम यांनी मुंबईत भाजपचाच महापौर होणार असा दावा केला नाही. ते महायुतीचा महापौर होणार असं म्हणत होते.