मुंबई महापौरची निवड कधी? तारीख आली समोर, शिंदेंचा की भाजपचा कुणाचा Mayor होणार?
BMC Mayor: मुंबईचा महापौर पदावरून सध्या घमासान सुरू आहे. किंगमेकर असलेली शिंदेसेना आणि मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच महापौर पदाच्या निवडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कधी होणार याविषयीचा निर्णय?

BMC Mayor BJP-Shivsena: मुंबईचा महापौर पद कुणाच्या पारड्यात यावरून चर्चा रंगली आहे. शिंदे सेनेने महापौर पदावर दावा सांगितलाय तर दुसरीकडे भाजपने थेट मेसेज दिलाय. हे पद मित्रपक्षाला देण्यास भाजपमधून विरोध सुरू झाला आहे. या रस्सीखेचदरम्यान महापौर पदाच्या निवडीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे शिंदे सेनेचे नेते दिल्ली दरबारी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री राज्यात परतल्यानंतर महापौर पदाविषयीची मोठी बैठक होईल. या महिन्याच्या अखेरीस याविषयी दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत.
उपमुख्यमंत्री आणि शिंदे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी महापौर पदावरून कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. महायुतीचाच महापौर होईल असे वक्तव्य त्यांनी केले. मग नगरेसवक कुणाच्या भीतीने ताज लँड या हॉटेलमध्ये ठेवले असा टोला विरोधकांनी त्यांना लगावला आहे. तर एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मुंबईच्या महापौर पदाबाबतच ही बैठक होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर शिवसेनेचा असावा अशी मागणी शिंदेंच्या गोटातून करण्यात येत आहे.
आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक
दरम्यान शिंदे सेनेच्या सूत्रांनी TIO ला दिलेल्या माहितीनुसार, शिंदेसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आज मंगळवारी पहिली प्राथमिक बोलणी होईल. बीएमसी निकालानंतर ही चर्चेची पहिली फेरी असेली. शिंदेसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि शिंदेसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे बैठकीत सहभागी होतील. तर राज्यात कुठे ही नवीन युती करण्याचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्टीकरण शिंदे गोटातून देण्यात आले आहे. राज्यात शिंदे सेना नवीन समीकरणं करणार असल्याच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले. तर महापौर हा महायुतीचा होणार असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
या महत्त्वाच्या तारखेला घडामोड
20 जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकणाऱ्यांसाठी गॅझेट नोटिफिकेशन
गट म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे 21-22 जानेवारी रोजी नोंदणी
महापौर पदाच्या आरक्षणाची लॉटरी पद्धतीने निवड 22 जानेवारी रोजी होईल
तर महापौर निवड 31 जानेवारी रोजी होण्याची शक्यता
महापौर पदी कोण असणार याविषयीचा निर्णय त्यापूर्वीच जाहीर होण्याची शक्यता
मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरुन परतल्यावर याविषयीच्या हालचालींना येणार वेग
