कुठे पोलिसांचा चोख बंदोबस्त, तर कुठे ऐनवेळी परवानग्या रद्द; मुंबईत बकरी ईद शांततेत साजरी

मिरा रोड, घाटकोपर आणि गोरेगाव येथील सोसायट्यांमध्ये बकरा कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर आज बकरी ईद निमित्त कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मुंबईत शांततेत सण साजरा केला जात आहे.

कुठे पोलिसांचा चोख बंदोबस्त, तर कुठे ऐनवेळी परवानग्या रद्द; मुंबईत बकरी ईद शांततेत साजरी
mumbai Bakri Eid
| Updated on: May 28, 2026 | 12:04 PM

आज राज्यभरात बकरी ईदचा सण साजरा होत आहे. सध्या मुंबई आणि उपनगरातील काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बकरा आणण्यावरून आणि कुर्बानीच्या परवानगीवरून गेल्या दोन दिवसांत तीव्र वाद निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर, आज बकरी ईदनिमित्त संपूर्ण मुंबई आणि मिरा-भाईंदर परिसरात अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्तात साजरा केला जात आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी संवेदनशील भागात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, सुरुवातीचा तणाव निवळल्यानंतर नागरिकांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत शांततेत सण साजरा केला.

मिरा रोडमध्ये पोलिसांचे चोख नियोजन

मिरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर वन या रहिवासी संकुलात काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या आवारात बकरा आणण्यावरून रहिवाशांच्या दोन गटांत तीव्र वाद झाला होता. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भाईंदर पोलिसांनी आज ईदच्या मुहूर्तावर संपूर्ण संकुलाला छावणीचे स्वरूप दिले आहे. आज सकाळपासूनच येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या रहिवाशांनी पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. काही दिवसांपूर्वी झालेला वाद दुर्दैवी होता, मात्र आजचा पवित्र दिवस आम्ही उत्साहात साजरा करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही ईद शांततेत साजरी करत असून पोलिसांनी केलेले सुरक्षा नियोजन खरोखरच कौतुकास्पद आहे, असे नागरिकांनी म्हटले.

मिरा रोडचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणि शांत आहे. संपूर्ण मिरा-भाईंदर शहरात आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठल्याही अप्रिय घटनेची नोंद झालेली नाही. काही सोसायट्यांच्या सदस्यांमध्ये अंतर्गत मतभेद आणि गैरसमज झाले होते, परंतु पोलीस प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी करून ते मतभेद दूर केले आहेत. सर्व नागरिक नेहमीप्रमाणे गुण्यागोविंदाने सण साजरा करत आहेत, असे निकेत कौशिक म्हणाले.

घाटकोपरमध्ये मुस्लीम बांधवांमध्ये तीव्र नाराजी

घाटकोपर येथील सागर पार्क सोसायटीमध्ये काल कमालीचा तणाव पाहायला मिळाला होता. सोसायटीच्या आवारात बकऱ्यांची कुर्बानी दिली जात असल्याच्या तक्रारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल या सोसायटीला भेट दिली होती. सोमय्या यांनी रहिवासी भागात कुर्बानी देण्यास तीव्र विरोध दर्शवल्यानंतर या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला. वाढता वाद पाहून मुंबई महानगरपालिकेने (BMC) सोसायटीला दिलेली बकऱ्यांची परवानगी ऐनवेळी अचानक रद्द केली. ज्यामुळे सोसायटीमधील मुस्लीम बांधवांमध्ये तीव्र नाराजी आणि तणावाचे वातावरण तयार झाले होते.

आज सागर पार्क सोसायटीच्या आत आणि बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती संवेदनशील असल्यामुळे राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या तरी येथील वाद शमला आहे. सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले की, काल पालिकेने परवानगी नाकारल्यामुळे आम्ही आजूबाजूच्या अधिकृत ठिकाणी कुर्बानी दिली आहे. मात्र, पालिकेने ऐनवेळी घेतलेला निर्णय चुकीचा होता. या अन्यायाविरोधात आम्ही येणाऱ्या काळात न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार आहोत.

गोरेगावात पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधानंतर शांतता

गोरेगाव पूर्व येथील गोकुळधाम परिसरातील सॅटेलाइट गार्डन या उच्चभ्रू रहिवासी संकुलातही अशाच प्रकारची घटना घडली. भाजप नगरसेविका प्रीती साटम यांनी रहिवासी संकुलाच्या सार्वजनिक आणि मोकळ्या जागेत कुर्बानी देऊ नये, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी या संदर्भात मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) लेखी तक्रार केली होती. यानंतर बीएमसीने सॅटेलाइट गार्डन प्रशासनाला बलिदानासाठी दिलेली परवानगी तातडीने रद्द केली. पालिकेच्या या निर्णयामुळे काल सायंकाळी गोकुळधाम परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, आज ईदच्या दिवशी सॅटेलाइट गार्डन परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले असून, पोलिसांच्या कड्या पहऱ्यात आणि शांततापूर्ण वातावरणात येथे सण साजरा केला जात आहे.

दरम्यान मुंबई आणि ठाणे पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सोसायट्यांमधील अंतर्गत वाद प्रशासकीय पातळीवर आणि संवादातून सोडवण्यात आले असून, सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Follow Us