गणेशमूर्ती विसर्जनाच्या करताना समुद्रकिनारी येणाऱ्या नागरिकांसाठी मुंबई महानगर पालिकेने सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाळ्यात या मोसमात मुंबईतील गिरगाव, जुहू आणि वसोर्वा अशा चौपाट्यांवर विसर्जनावेळी ब्लू बटन जेलीफीश, स्टिंग रे अशा प्रजातीच्या माशांचा दंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे हा सण साजरा करावा आणि खोल पाण्यात उतरु नये असे आवाहन देखील पालिकेने केले आहे.
मुंबईच्या समुद्र किनारी ब्ल्यू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे प्रजातीच्या माशांच्या संभाव्य वावराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत. गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत.
समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत सावध
मुंबई येथील समुद्राच्या किनारपट्टीवर ब्लू बटन जेलीफीश, स्टिंग रे प्रजातीच्या माशांच्या वावरासंदर्भात पालिकेने मत्स्यव्यवसाय विभागाला विचारणा करण्यात आली होती. त्यानुसार, मत्स्यव्यवसाय विभागाने गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान मुंबई येथील समुद्रात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांचा वावर असतो आणि नागरिकांना मत्स्यदंश होऊ शकतो. यापासून बचावासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती महानगरपालिकेने केली आहे.
मुंबई येथील किनारपट्टी ही एक संरक्षित किनारपट्टी असल्याने या किनारपट्टीला वेगवान पाण्याचा प्रवाह नाही. त्यामुळे जेलीफिशसारख्या जलचरांसाठी येथे मुबलक प्रमाणात प्लवंगसदृश खाद्य तयार होते. त्यामुळे या कालावधीत ‘ब्ल्यू बटन जेली’सारख्या जलचरांचे संगोपन आणि संवर्धन होते. याबरोबर सर्व किनारपट्टीवर कमी पाण्याचा प्रवाह किंवा संरक्षितपणा असल्यामुळे या किनारपट्टीच्या वालुकामय क्षेत्रामध्ये ‘स्टींग रे’ (पाकट) याचेही संवर्धन आणि संगोपन होत असते. त्यामुळे मुंबईकर नागरिक व पर्यटक यांनी समुद्रकिनारी जाताना महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
पालिकेने जारी केल्या सूचना
१) गणेश विसर्जन पालिकेच्यावतीने नेमणूक केलेल्या जीवरक्षक आणि यंत्रणेमार्फत करावे.
२) गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करू नये.
३) पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.
४) गणेशभक्तांनी उपरोक्त सुचनांचे पालन करण्यासाठी चौपाट्यांवर उपलब्ध असलेल्या नागरी गणेशोत्सव प्रणालीचा वापर करावा.
५) गणेशमूर्ती विसर्सनाच्या ठिकाणच्या वैद्यकीय कक्षांमध्ये मत्स्यदंशाच्या अनुषांगीक आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून ठेवावा.
६) नागरिकांच्या जनजागृतीसाठी मुंबई पालिकेच्यावतीने चौपाट्यांवर लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील सूचना तसेच उद्घोषकांद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे.
७) लहान मुलांना पाण्यामध्ये जावू न देण्याची खबरदारी घ्यावी.
मत्स्यदंश आणि प्रथमोपचार
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवला आहे. तसेच एक १०८ रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात केली आहे.
१) ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
२) ‘स्टींग रे’ किंवा ‘जेली फिश’चा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरू नये. तत्काळ नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत.
३) जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाकावे.
४) जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
५) मत्स्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढावी.
६) जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.