2024 मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचंय, इडापीडा नष्ट कर; सामनातून आगामी निवडणुकीवर भाष्य

| Updated on: Sep 19, 2023 | 10:01 AM

Saamana Editorial on Loksabha Election 2024 : इडापीडा नष्ट कर, लोकशाहीवरील विघ्न दूर कर! 2024 मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचंय; सामनातून आगामी निवडणूक आणि लोकशाहीवर भाष्य, वाचा सविस्तर...

2024 मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचंय, इडापीडा नष्ट कर; सामनातून आगामी निवडणुकीवर भाष्य
Follow us on

मुंबई | 19 सप्टेंबर 2023 : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. ठिकठिकाणी गणरायाचं वाजत गाजत स्वागत केलं जात आहे. बाप्पाकडे आपल्या इच्छा बोलून दाखवल्या जात आहेत. आजच्या सामनाच्या अग्रलेखातूनही बाप्पाकडे मागणं मागितलं आहे. इडापीडा नष्ट कर! या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे 2024मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचंय. गणराया, देशात वाढलेला दंभ आणि सुंभ, जनतेची इडापीडा नष्ट कर आणि लोकशाहीवरील विघ्न दूर कर!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

‘हूल’ आणि ‘भूल’ ही सध्याच्या राज्यकर्त्यांची प्रमुख शस्त्र आहेत. त्यांचा वापर करीत जनतेला भुलभुलैयात ठेवण्याचा उद्योग नऊ वर्षांपासून सुरू आहे. मात्र या नऊ वर्षांच्या सत्तेने आपल्याला फक्त ‘कळा’च दिल्या, हे आता जनतेला समजले आहे.

त्यामुळे 2024मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचेच, असा निश्चय जनतेने मनाशी केलाच आहे. ‘गणराया, देशात वाढलेला दंभ आणि सुंभ, जनतेची इडापीडा नष्ट कर आणि लोकशाहीवरील विघ्न दूर कर!’ अशीच प्रार्थना तमाम गणेशभक्तदेखील आज घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांच्या चरणी करीत असतील.

प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आज परंपरागत उत्साह आणिजोशात श्री गणरायांची प्राणप्रतिष्ठा होईल. घरगुती गणपती असोत की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे, सगळीकडे तोच उत्साह दिसेल. त्यातही महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी गणेशोत्सव हा श्रद्धा, भावना, आस्था आणि अपार चैतन्याचाच उत्सव असतो. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत श्रद्धा आणि चैतन्याच्या लाटाच उसळलेल्या दिसतील.

कितीही संकटे असली, प्रतिकूल परिस्थिती असली तरी गणपती बाप्पांचे आगमन आणि त्यांना दिला जाणारा निरोप धूमधडाक्यातच पार पडतो. यंदा कोरोनाचे सावट दूर झाले आहे. तथापि, त्याची जागा इतर अनेक संकटांनी घेतली आहे. देशासमोरील आव्हाने वाढतच आहेत आणि सर्वसामान्य जनतेवरील संकटांमध्येही दिवसागणिक भर पडत आहे. या वर्षी पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे राज्यावर गंभीर दुष्काळाचे सावट आहे.

ज्या मराठवाड्यावर हे सावट गडद आहे तेथे दोन दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सुमारे 50 हजार कोटींच्या ‘पॅकेज’ची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. एकीकडे दुष्काळ, नापिकी, त्यातून उद्भवलेला कर्जबाजारीपणा, त्यामुळे आणि दुसरीकडे मिंधे राज्यकर्त्यांच्या फसव्या घोषणा हे राज्यावरील एक गंभीर संकटच आहे. दिल्लीश्वरांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राच्या माथी लादलेले हे संकट कायमचे दूर कर, अशीच प्रार्थना राज्यातील जनता आज श्रीचरणी करीत असेल. केंद्रातील ‘स्वयंघोषित’ राजकर्त्यांबाबतही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

महागाईपासून बेरोजगारीपर्यंत, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यापासून रोजगारनिर्मितीपर्यंत, धर्मापासून विकासापर्यंत, देशाच्या संरक्षणापासून तथाकथित आत्मनिर्भरतेपर्यंत फक्त डंका आणि बोभाट्याचे फुगे हवेत सोडले जात आहेत. राज्याराज्यांत जातीय, धार्मिक ध्रुवीकरणाचे उद्योग सुरू आहेत. त्यातून दंगली पेटवून त्यावर राजकीय स्वार्थाच्या पोळय़ा भाजण्याचे सत्तापक्षाचे इरादे आहेत.