जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…

मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्या प्रस्तावित मुंबई आंदोलनापूर्वी राज्याच्या गृह विभागाने मोठे आदेश काढले आहेत. मुंबईत आझाद मैदान वगळता इतरत्र आंदोलनाला बंदी घालण्यात आली आहे. आझाद मैदानातही केवळ एक दिवस, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करता येईल. तसेच शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी परवानगी नाही. हे निर्बंध दोन्ही नेत्यांसाठी मोठा धक्का मानले जात आहेत.

जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात...
Azad Maidan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 12:10 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही 1 सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चा आयोजित केला आहे. मात्र, या दोन्ही नेत्यांना आंदोलनापूर्वीच मोठा झटका बसला आहे. राज्याच्या गृह विभागाने तातडीचे आदेश काढून मुंबईत आझाद मैदान वगळता कुठेही आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आझाद मैदानातही एका दिवसाच्यावर आंदोलन करता येणार नाही. तसेच आखून दिलेल्या वेळेतच आंदोलन करता येणार आहे. त्यामुळे जरांगे आणि हाकेंसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.

राज्याच्या गृह विभागाने मुंबईतील आंदोलनाबाबतचे आदेश काढले आहेत. आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे आणि जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागाने पूर्णपणे बंदी घातली आहे. आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी दिली जाईल. त्यानंतर मैदानात थांबल्यास दंड आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Loading...

शनिवार, रविवारी परवानगी नाही

गृह विभागाने कोणत्याही आंदोलनासाठी आझाद मैदान हे एकमेव अधिकृत ठिकाण घोषित केले आहे. आंदोलकांना मुंबई जिमखाना, महापालिका मुख्यालय, हजारीमल सोमाणी मार्ग आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्र अशी सीमा आखून देण्यात आली आहे. शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलन करण्याची मुभा देण्यात आली आहे. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी आंदोलनाला परवानगी मिळणार नाही, असं आदेशात म्हटलं आहे.

तातडीने अधिसूचना काढली

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून आंतरवली सराटीमध्ये व्यापक आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी मुंबईतही धडकण्याचा इशारा दिला आहे. तसेच दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी आणि सरकारच्या भूविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने तातडीने अधिसूचना जारी करून आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भागात आंदोलनाला बंदी घातली आहे.

आंदोलनासाठी अन्य अटी

मोर्चे आणि बेमुदत ठिय्या आंदोलनावर बंदी.

5 हजार आंदोलकांनाच परवानगी.

आंदोलकांनी आझाद मैदानावरच जमावे आणि तिथूनच पांगावे.

ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल, रिक्षा, हातगाडी, जड वाहने आणि प्राणी आणण्यास बंदी.

पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकरला परवानगी नाही.

नऊ बाय सहा फुटांपेक्षा मोठा बॅनर, झेंडा नको.

झेंड्याची काठी दोन फुटांपेक्षा मोठी नको.

तंबू-मंडप उभारण्यास बंदी.

लाठ्या, तलवारी, भाले बाळगण्यास बंदी.

जरांगेंशी चर्चा फिस्कटली अन्…

मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ त्यांना अंतरवली सराटीत भेटायला गेलं होतं. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शंभुराजे देसाई, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटीत जाऊन जरांगे यांची भेट घेतली होती. यावेळी या शिष्टमंडळाने जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण जरांगे यांनी त्याला ठाम नकार दिला आहे. जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. जरांगे हे अंतरवली सराटीत आंदोलन करणार आहेत. मात्र, त्यांनी मुंबईतही धडकण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जरांगे नेमकं कुठे आंदोलन करणार याचा संभ्रम असल्याने सरकारने खबरदारी घेतली आहे. जरांगे मुंबईत आल्यावर त्यांचं आंदोलन किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. शिवाय 29 तारीख शनिवारी येत आहे. त्यामुळे सरकारने हे तातडीचे निर्देश काढले असावेत अशी चर्चा सुरू आहे. तर, हाके यांनी थेट मुंबईतच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी हजारो लोकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे मुंबईत गर्दी होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us