
Mumbai Railway Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार १९ जानेवारी २०२५ रोजी मेगा ब्लॉकचे आयोजन केले आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उपनगरीय विभागाच्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. त्याचा परिणाम एक्स्प्रेस गाड्यांवर होणार आहे. पाच तास एक्स्प्रेस गाड्या धीम्या गतीने धावणार आहे. माटुंगा येथील मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० पर्यंत कामे चालणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे मेगा ब्लॉक करण्यात आल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
१९ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांवर थांबतील. या गाड्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचणार आहे. ठाण्याच्या पुढे धावणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांवर थांबून माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.