Mumbai Rain: बाप्पाच्या आगमनाआधी पावसाची हजेरी! यलो अलर्टनंतर गणेशभक्तांमध्ये काळजी
Mumbai Rain: गेल्या काही दिवसांपासून दांडी मारल्यानंतर पुन्हा एकदा मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये काळजीचे वातावरण पहायला मिळत आहे.

गणेशोत्सवाच्या आगाऊ तयारीला यंदा पावसाने अडथळा आणला आहे. बाप्पाच्या आगमनानिमित्त शहरात आणि उपनगरांमध्ये जोरदार तयारी सुरू असतानाच अचानक मुसळधार पावसाने मुंबईकरांचे नियोजन बिघडवले आहे. अनेक दिवसांच्या कोरड्या काळानंतर आलेल्या या दमदार पावसामुळे भक्तांना दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे – एकीकडे मूर्ती आणणे, सजावट आणि खरेदीची लगबग, तर दुसरीकडे रस्त्यांवर साचलेले पाणी आणि वाहतुकीतील कोंडी.
रात्रीपासून मलबार हिल, गिरगाव त्यासोबतच संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. आज आणि उद्या अशाच पद्धतीने पावसाची संततधार सुरु राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढीत तीन ते चार तास मुंबईत मुळसधार पाऊस पडणार असा देखील अंदाज वर्तवला जात आहे. मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी पाणी देखील साचायला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. प्रशासन देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबईत पावसाचा जोर
मध्यरात्रीपासूनच मुंबईत पावसाने जोर धरला. पहाटेपासून कोसळणाऱ्या सरींमुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. बाजारातील खरेदीची गर्दी आणि रस्त्यांवरील सजावटीच्या कामांवर याचा थेट परिणाम दिसत आहे. नागरिक छत्री-रेनकोट घेऊन बाहेर पडत आहेत, तरीही पावसाच्या जोरामुळे हालचाल मर्यादित झाली आहे.
नालासोपारा रेल्वे स्थानकातही पाणी साचल्याचे चित्र
वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात सकाळपासून पावसाचा कहर अनुभवला जात आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सार्वजनिक मंडळे आणि घरगुती बाप्पाच्या मूर्ती घरी किंवा मंडपात आणताना भक्तांना प्लास्टिकच्या आवरणाचा आधार घ्यावा लागत आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकातही पाणी साचल्याचे चित्र आहे. या परिसरासाठी हवामान विभागाने आज आणि उद्या यलो अलर्ट जारी केला आहे.
ज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागानुसार ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू आहे. १५ सप्टेंबरनंतर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खडतर ठरत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. कोलाड ते इंदापूर पट्ट्यात सुमारे दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागले. आजची वाहतूक कालच्या तुलनेत थोडी संथ असली तरी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
