धक्कादायक… मोबाईलवर बोलता बोलता थेट 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडला, त्या व्यक्तीची फक्त चप्पलच… मुंबई हादरली
Mumbai Tragedy : मुंबईत साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये एक जण पडल्याची घटना घडली. या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार लांडे यांनी दिली.

मुंबईत एकीकडे पावसाचा कहर सुरू असताना दुसरीकडे दुर्घटना घडू लागल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये एका शाळेच्या बसवर झाड कोसळलं होतं. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईच्या साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये एक जण पडल्याची घटना उघडकीस आली आहे. जवळपास 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये एक जण पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी मदतीसाठी धावले.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काही आठवड्यापूर्वीच शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान महापौरांसमोरच पालिका कर्मचारी खड्यात पडला होता. आता महापौरांच्या पाहणीनंतरही मुंबईत पावसादरम्यान दुर्घटना घडू लागल्या आहेत. एकीकडे जोरदार पाऊस सुरू असताना कुर्ला खैरानी रोडवरील मेनहॉलमध्ये एक जण पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीला शोधण्याचे काम सुरू केले.
नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, साकीनाका येथील खैराणी रोडवर सन्मान हॉटेलजवळ मोबाइलवर बोलत चालत असताना एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडली. या भागात खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू होते. त्यामुळे मॅनहोलचे झाकण उघडे होते. या व्यक्तीच्या शोधादरम्यान संबंधित व्यक्तीची छत्री आणि चप्पल आढळली आहे. मुंबईतील पावसाच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने ती व्यक्ती वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या व्यक्तीला शोधण्याचं काम MFB, पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाकडून शोधकार्य सुरू होते.
मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू
उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीची शोधाशोध सुरू असताना आमदार दिलीप लांडे यांनी धक्कादायक माहिती दिली. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार दिलीप लांडे यांनी दिली. मॅनहोलमधील पाण्याचा वेग जास्त असल्याने व्यक्तीचा वाचण्याची शक्यता कमी होती. अन्सारी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे कळताच प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही जीव धोक्यातच आहे, अशा शब्दात सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.