घाटकोपर स्थानकात थरार! ट्रेनवर चढलेल्या युवकाला OHE चा शॉक; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकात लोकलच्या टपावर चढलेल्या तरुणाला ओएचईचा शॉक लागल्याने लोकलचा खोळंबा झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सायंकाळी कामावरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांना फटका बसला आहे.

घाटकोपर स्थानकात ट्रेनवर चढलेल्या युवकाला ओव्हरहेड वायरचा शॉक लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांना लोकल विलंबाचा फटका सहन करावा लागला आहे. ऐन पिकअवरला मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. घाटकोपर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर लोकल ट्रेनवर चढण्याचा प्रयत्न करताना अज्ञात युवकाला ओव्हरहेड वायरचा जोरदार शॉक बसल्याने लोकल बिघाडली आहे.
घाटकोपर स्थानकात सायंकाळी 6.33 वाजता घडलेल्या या घटनेमुळे टिटवाळा लोकल ट्रेन काही काळ स्थानकातच खोळंबली. अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यान डाऊन मार्गावरील OHE वीजपुरवठा नऊ मिनिटांसाठी बंद करण्यात आला. वीजपुरवठा खंडित झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे.लोकलची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.
तांत्रिक बिघाडानंतर लोकल रवाना
रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शॉक लागलेल्या तरुणाला खाली काढत रुग्णालयात नेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 6.52 वाजता टिटवाळा – 43 लोकल पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
