मनोज जरांगे पाटील मागे हटणार नाहीत, संजय राऊत यांच्याकडून पुन्हा विश्वास व्यक्त; म्हणाले, हा विषय आता…
Sanjay Raut on Manoj Jarange Patil and Maratha Reservation : मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण; संजय राऊत यांची सविस्तर प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील मागे हटणार नाहीत, संजय राऊत यांच्याकडून पुन्हा विश्वास व्यक्त. इंडिया आघाडीबद्दल काय म्हणाले?

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण छेडलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. सरकारचं शिष्टमंडळ वारंवार त्यांच्या भेटीला जात आहे. आज चौथ्यांदा या शिष्टमंडळाने ही बैठक घेतली आहे. त्यांना वारंवारक उपोषण मागे घेण्याची विनंती परंतू अद्याप त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं नाही. मागण्या पूर्ण होत नाहीत. तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यांच्या या आंदोलनाला अनेकांना पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील मागे हटणार नाहीत. सरकारला मराठवाड्यातील कॅबिनेट आधी हे सगळं गुंडाळायचं आहे. लोकांनी विरोध करू नये, यांच्या गाड्या फोडू नयेत, रस्त्यावर उतरू नये यासाठीच हे सारं सुरू आहे. कालच्या बैठकीचा कुणाला काही पडलेलं नाही, त्यातून काहीच साध्य झालं नाही, असं संजय राऊत म्हणाले. मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात मांडला जावा, असंही मत त्यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनात हा विषय आला पाहिजे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
जी 20 आलेल्या प्रत्येक देशाला भारतातून काहितरी मिळवून देण्याचं अमिष दाखवलं गेलं म्हणून ते आले. सगळे राष्ट्रप्रमुख त्यासाठीच आले होते. जो बायडेनसोबत केलेला करार प्रकाश आंबेडकरांनी पुराव्यासकट दिला होता. सौदीच्या राजकुमारासोबत केलेला बारसूचा करारही त्याचाच एक भाग होता. माजी लष्कर प्रमुखांनी असं बेजबाबदार वक्तव्य करू नये. आधी लडाख, अरूणाचल इथला विवादीत भाग भारतात आणा, असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत आघाडी केली आहे. या आघाडीला इंडिया असं नाव देण्यात आलं आहे. या आघाडीत मतभेद असल्याची टीका युतीकडून करण्यात येत आहे. यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. भाजपला येत्या निवडणुकीत हरवण्यासाठी आणि देशाला वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. आम्ही सगळे पक्ष एकमताने पुढे जात आहोत. इंडिया आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
