
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या आधुनिकीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत मुंबई रेल्वे विकास महामंडळ लि. (एमआरव्हीसी) ने 2,856 पूर्ण वातानुकूलित वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांच्या खरेदीची निवादा काढली आहे. ही निविदा दीर्घकाळ देखभालीच्या करारासह मागवण्यात आली आहे.या गाड्या 12, 15 आणि 18 डब्यांच्या रचनेचे असतील, गरज आणि आवश्यकतेनुसार ते उपलब्ध केले जातील. यामुळे प्रवासी क्षमता, सोय आणि सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.
सध्या मुंबईतील बहुतेक उपनगरीय गाड्या 12 डब्यांच्या चालवल्या जातात, तर 15 डब्यांच्या रॅकसह केवळ काहीच फेऱ्या सुरू आहेत. भविष्यातील मागणी पूर्ण करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी या खरेदीत मोठ्या प्रमाणावर 15 डब्यांच्या फेऱ्याचा आणि आवश्यकतेनुसार 18 डब्यांच्या रॅकचा समावेश होणार आहे.
6 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP) फेज III आणि IIIA अंतर्गत अपलोड करण्यात आलेली ही निविदा, केवळ आधुनिक रॅक पुरवण्यावरच नव्हे तर पुढील 35 वर्षांपर्यंत त्यांच्या देखभालीवर देखील भर देते. दोन अत्याधुनिक मेंटेनेंस डेपो मध्य रेल्वेवरील भीवपूरी आणि पश्चिम रेल्वेवरील वाणगांव येथे विकसित केले जातील. निविदा सादरीकरण 8 डिसेंबर 2025 पासून सुरू होईल आणि निविदा उघडण्याची तारीख 22 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. ही निविदा मेक इन इंडिया धोरणानुसार राबवली जाईल, ज्यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात समावेश होईल.
•वातानुकूलित, पूर्णपणे वेस्टिब्यूल्ड रॅक
•जास्त त्वरण व ब्रेकिंग क्षमता, वेळेवर धावण्यासाठी उपयुक्त
•सुरक्षासाठी स्वयंचलित दरवाजे बंद प्रणाली
•आधुनिक आतील सजावट, गादीदार आसन, मोबाइल चार्जिंग पॉईंट आणि माहिती प्रणाली
•130 कि.मी. प्रति तास पर्यंत वेग क्षमता
•दोन्ही टोकांना विक्रेत्यांसाठी डबे (स्वतंत्र एसी डक्टसह)
•उच्च क्षमतेचे एचव्हीएसी – मुंबईच्या हवामानातील प्रवाशांच्या आरामाची खात्री करणे
•जागतिक दर्जाच्या सुरक्षा प्रणाली, ज्यामध्ये सुधारित ब्रेकिंग आणि प्रवासी प्रवाह डिझाईनचा समावेश आहे
करार झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांत पहिला प्रोटोटाईप मुंबईत दाखल होईल.
‘2,856 वंदे मेट्रो (उपनगरीय) डब्यांची ही महत्त्वाकांक्षी खरेदी मुंबईच्या वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये एक मोठा बदल घडवून आणेल. 12, 15 आणि 18 डब्यांचे अधिक लांब, जलद आणि सुरक्षित रॅक सुरू झाल्यानंतर आम्ही गर्दी कमी करणे तसेच वेळेवर फेऱ्या चालवून प्रवाशांची सुरक्षा यावर अधिक भर दिला जाईल. स्वयंचलित दरवाजे, प्रगत तांत्रिक वैशिष्ट्ये आणि जागतिक दर्जाची देखभाल सहाय्य यांसारख्या आधुनिक सुविधांसह एमआरव्हीसी लाखो दैनंदिन प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करणारी भविष्याभिमुख उपनगरीय रेल्वे सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष विलास सोपार वाडेकर यांनी म्हटले आहे.