
मुंबई-नाशिक लोकल ट्रेन सेवा शक्य आहे का? असं प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल, तर तो काढून टाका. कारण आता मुंबई ते थेट नाशिक पर्यंत लोकल ट्रेन सुरु होणार आहे. या मार्गातील दीर्घकाळापासूनचा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. रेल्वे बोर्डाने दोन नव्या रेल्वे लाइन्सला मंजुरी दिली आहे. मनमाड आणि कसाऱ्यादरम्यान 131 किमीचा मार्ग कव्हर होणार आहे. या नव्या रेल्वे लाइन्समुळे सह्याद्रीच्या रांगेत रेल्वे वाहतूक अजून वेगवान आणि सहज होणार आहे. डोंगर रांगांचा हा भाग आहे. इथे जवळपास 18 बोगदे बांधावे लागतील. या मार्गावर लांब पल्ल्याच्या ट्रेन्सना बँकर इंजिन्सचा आधार घ्यावा लागतो. जमीन अधिग्रहणासाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने मिशन मोडमध्ये काम सुरु केलय.
नव्या मार्गामुळे सध्याच्या मार्गावरील ताण कमी होईल. मालवाहतूक करणाऱ्या ट्रेन्ससाठी स्वतंत्र मार्गिका असल्याने प्रवासी वाहतुकीला वेग येईल, खासकरुन गर्दीच्यावेळी. देशात मुंबई उपनगरीय लोकलमधून सर्वाधिक प्रवासी वाहतूक होते. मध्य रेल्वे मार्गावर हे जे नवीन काम होणार आहे, त्यामुळे उपगनरीय लोकलचा कसाऱ्यापुढे नाशिकपर्यंत विस्तार शक्य आहे. प्रवाशांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आता प्रत्यक्षात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेला आता जास्त ट्रेन चालवता येतील. या व्यस्ततम मार्गावर प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.
पुढच्यावर्षीपर्यंत या कामाला गती येण्याची शक्यता
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नाशिक-मनमाड मार्गावर लोकल सेवा सुरु होईल. प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. कुठल्याही विलंबाशिवाय ट्रेन्स सतत या मार्गावर धावत राहतील. उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई दरम्यान एक ट्रान्सपोर्ट लिंक तयार होईल. नियमित प्रवासाशिवाय यामुळे औद्योगिक विकास, मालवाहतूक कनेक्टिविटी वाढेल. पुढच्यावर्षीपर्यंत या कामाला गती येण्याची शक्यता आहे.