मध्य रेल्वेवर मोठा तांत्रिक बिघाड, लोकल पुन्हा विस्कळीत, कामावर जाणाऱ्यांची तारांबळ
मध्य रेल्वेची लोकल वाहतूक वांगणी-बदलापूर दरम्यान ठप्प झाली आहे. सकाळी कामाच्या वेळेत आधुनिक ट्रॅकमधील अग्निरोधक यंत्रणा सक्रिय झाल्याने मुंबई-कर्जत डाऊन मार्गावरील गाड्या थांबल्या. यामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. ऐन सकाळी कामाच्या वेळेत मध्य रेल्वेवर मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. मध्य रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई-कर्जत उपनगरीय मार्गावर वांगणी आणि बदलापूर या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे हजारो चाकरमान्यांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावर आधुनिक रेल्वे ट्रॅकमध्ये बसवलेली अग्निरोधक यंत्रणा अचानक सक्रिय झाली. रेल्वे सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, जेव्हा ही यंत्रणा सक्रिय होते, तेव्हा मार्गावरील संभाव्य धोका टाळण्यासाठी त्या मार्गावरून जाणाऱ्या सर्व लोकल, मेल आणि एक्सप्रेस गाड्या ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टीममुळे आपोआप जागेवर थांबतात. या तांत्रिक बिघाडामुळे डाऊन मार्गावरील गाड्या पूर्णपणे थांबल्या आहेत.
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही थेट परिणाम
हा खोळंबा सकाळच्या अत्यंत गर्दीच्या वेळी झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावरून कर्जतच्या दिशेने निघणाऱ्या आणि कर्जतहून सीएसटीकडे येणाऱ्या मार्गावर असलेल्या सर्व लोकल गाड्या ट्रॅकवरच रखडल्या आहेत. यामुळे या गाड्यांमधील प्रवाशांना बराच वेळ थांबून राहावे लागत आहे. डाऊन मार्गावरील मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही याचा थेट परिणाम झाला आहे. त्यादेखील मार्गावर अडकल्या आहेत.
डाऊन मार्गावर मोठी कोंडी आणि गाड्या अडकल्यामुळे, रेल्वे प्रशासनाला वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही लोकल गाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. त्यांची गती कमी करावी लागली आहे. त्यामुळे अप मार्गावर कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील गाड्या देखील उशिराने धावत आहेत. त्यामुळे वाहतूक संथ झाली आहे. यामुळे कामावर, शाळा-कॉलेजला जाणाऱ्या नियमित प्रवाशांना पोहोचण्यास मोठा विलंब होत आहे.
तात्काळ उपाययोजना सुरू
सध्या अनेक प्रवासी बदलापूर स्थानकात किंवा इतर स्थानकांवर लोकलची वाट पाहत उभे आहेत. यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी जमली असून प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन आणि तांत्रिक पथक वांगणी-बदलापूर दरम्यान सक्रिय झालेल्या अग्निरोधक यंत्रणेची तपासणी करून ती लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहे. दोन्ही मार्गांवरील वाहतूक सामान्य करण्यासाठी तात्काळ उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
