मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास आता 1 तासात, अखेर विमान सेवा सुरू, तिकीट दर किती असणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास आता 1 तासात होणार आहे. कारण विमान सेवा सुरू झाली आहे. या विमानसेवेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

मुंबईतून कोकण प्रवास आता जलद होणार आहे. एक्स्प्रेस ट्रेनच्या गर्दीत धक्के न खाता विमानाने प्रवास करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. विमानसेवा सुरू झाल्याने आता तळकोकणात जाण्यासाठी अनेक तासांचा प्रवास करण्याची गरज नाही. मुंबईतून सिंधुदुर्गात एका तासात पोहोचता येणार आहे. कारण नवी मुंबई ते सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळादरम्यान नियमित विमानसेवा सुरू होतेय. या विमानसेवेमुळे कोकणवासीयांचा वेळेची बचत होणार आहे. या प्रवासाचे तिकीटदर देखील परवडणारे आहेत.
नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवेमुळे कोकणवासींना मोठा फायदा होणार आहे. तर या सेवेमुळे पर्यटक देखील सिंधुदुर्गात जाऊ शकतात. ही सेवा सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदा प्रवास करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. ही सेवा सुरू झाल्यानंतर ही विमान सेवा नियमित सुरू राहावी. त्यानंतर कोणत्याही कारणाने खंडित होऊ नये, अशी साधी अपेक्षा कोकणवासीयांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई विमानसेवेच्या तिकिटांचे बुकिंग कालपासून सुरू झालं होतं.
विशेष म्हणजे, आता आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा उपलब्ध होणार असल्याने कोकणवासीयांना मोठा दिलासा मिळालाय. विमानसेवा सुरू झाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी ट्विट करत प्रवासी आणि पर्यटकांना या विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केलं होतं.
कोणाला होणार फायदा ?
या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. कोकणवासीय, पर्यटक, व्यावसायिक तसेच मुंबई आणि नवी मुंबईशी नियमित संपर्क ठेवणाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासोबतच जिल्ह्याची मुंबई महानगर प्रदेशाशी हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण घडामोड ठरणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. सिंधुदुर्गला जाणाऱ्या विमानाची प्रवासी क्षमता 72 असणार आहे. तर तिकीट दर अंदाजे 3500 रु. ते 7500 रुपये दरम्यान आहेत. परंतु हे दर मागणी आणि तारखेनुसार बदलू शकतात.
