‘ग्रीन सिग्नल’मध्ये रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू, 9 वर्षांनी महिला कारचालक निर्दोष

| Updated on: Feb 20, 2020 | 1:03 PM

वाहनांना ग्रीन सिग्नल सुरु असताना पादचारी रस्ता ओलांडत होता, त्यामुळे या दुर्घटनेसाठी महिला कारचालकाला जबाबदार धरता येणार नसल्याचं कोर्टाने म्हटलं.

ग्रीन सिग्नलमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू, 9 वर्षांनी महिला कारचालक निर्दोष
Follow us on

मुंबई : गाड्यांना ‘ग्रीन सिग्नल’ असतानाही रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधित कार चालवणाऱ्या महिलेला मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर 65 वर्षीय महिलेची सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता (Woman Car Driver Hit Jaywalker) झाली.

सदानंद भाताडे मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात 22 जानेवारी 2011 रोजी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडले होते. रस्ता ओलांडताना कारने दिलेल्या धडकेत भाताडेंचा मृत्यू झाला होता. कार चालवणाऱ्या 65 वर्षीय कल्पना मर्चंट यांना भाताडेंच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवण्यात आलं होतं.

वाहनांना ग्रीन सिग्नल सुरु असताना भाताडे रस्ता ओलांडत होते. त्यामुळे या दुर्घटनेसाठी मर्चंट यांना जबाबदार धरता येणार नसल्याचं कोर्टाने म्हटलं.

त्या दिवशी काय झालं?

22 जानेवारी 2011 रोजी मरिन ड्राइव्ह परिसरात ग्रीन सिग्नल असतानाही सदानंद भाताडे रस्ता ओलांडत होते. त्यामुळे ते कल्पना मर्चंट या महिलेच्या गाडीखाली आले आणि त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणाची चौकशी सुरु असताना कल्पना मर्चंट वेगात गाडी चालवत नसल्याचं आढळलं. तसंच गाड्यांना ग्रीन सिग्नल सुरु असतानाही भाताडे रस्ता ओलांडत असल्याची बाब समोर आली.

हेही वाचा : स्वच्छतेचा अतिरेक, नोटा धुवून सुकवणे, मुलांना वारंवार आंघोळ, वैतागलेल्या पतीकडून पत्नीची हत्या 

मर्चंट मिडल लेनमधून धीम्या गतीने गाडी चालवत होत्या. भाताडे उजव्या बाजूने गाडीसमोर आल्यामुळे त्यांना गाडीची जोरदार धडक बसली. ते जागीच कोसळून बेशुद्ध पडले.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, पण त्यांचा मृत्यू झाला होता, असं मर्चंट यांच्या मागील कार चालवणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने कोर्टाला सांगितलं. कोर्टाने साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे कल्पना मर्चंट यांना क्लीन चिट (Woman Car Driver Hit Jaywalker) दिली आहे.