मोठी बातमी! मतदानाला काही तास उरले असतानाच या नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक, ढोल-ताशे, फटाके, गुलाल पुन्हा सांदाडात

Municipal Council Elections Postponed: मतदानाला अवघे काही तास उरलेले असतानाच राज्यातील काही नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले.

मोठी बातमी! मतदानाला काही तास उरले असतानाच या नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक, ढोल-ताशे, फटाके, गुलाल पुन्हा सांदाडात
नगरपालिका, नगरपरिषद निवडणूक
Updated on: Nov 30, 2025 | 12:44 PM

नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींच्या प्रचारासाठी आज सुपर संडे आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावतील. पण त्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यातील काही नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. या ठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. या घडामोडींमुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. याठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या चार ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दल कोर्टात अपिल असल्याने नगरपरिषद निवडणूक पुढे ढकलली आहे. याबरोबरच सात नगरसेवक पदाच्या उमेदवाराबाबत कोर्टात अपिल असल्याने त्या ठिकाणी देखील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढे ढकललेल्या नगरपरिषद आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये 10 डिसेंबर पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत, तर 20 डिसेंबर मतदान आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

धाराशिवमधील तीन प्रभागांची निवडणूक केव्हा?

धाराशिव शहरातील न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या तीन प्रभागांची 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. धाराशिव शहरातील प्रभाग 2 अ 7 ब आणि 14 ब या प्रभागातील उमेदवारांवरती आक्षेप घेतल्याने न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मात्र या तीन प्रभागातील मतदारांना नगराध्यक्ष पदासाठी पूर्व नियोजित वेळेनुसार म्हणजे 2 डिसेंबरलाच मतदान करता येणार असल्याची प्रशासनाने माहिती दिली.या तीन प्रभागातील जागांसाठी जिल्हाधिकारी चार डिसेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत.

2 नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर

सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिकांपैकी 2 नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर आहे. फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक रद्द करण्यात आली आहे आणि ती पुढे ढकलण्यात आली आहे. या नगरपरिषदांमध्ये अर्ज छाननी बाबत काही उमेदवारांनी उच्च न्यायालयात अपील केले होते.

या चार बाबींमुळे ही निवडणूक पुढे ढकलली

1) अपिलाचा निकाल उशिरा लागल्या नंतरही. अथवा

2) लेखी निकाल प्राप्त न होता .अथवा

3) काही प्रकरणी अपिलांची सुनावली झाली नसताना, अथवा

4) काही प्रकरणी न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारांना आपला नामनिर्देशित पत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता चिन्ह वाटप केले. या नियमांचे पालन न केल्यामुळे उच्च न्यायालयाने दोन्ही नगर परिषदेचा कार्यक्रम पुन्हा घेण्याचे निर्देश दिले आहेत

त्यानुसार दोन्ही नगरपालिकेचा सुधारित कार्यक्रम जाहीर

4 डिसेंबर रोजी दोन नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार

नामनिर्देशित पत्र 10 डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेण्याचा अवधी

20 डिसेंबर रोजी मतदान

21 डिसेंबर मतमोजणी

23 डिसेंबर रोजी निकाल

जिल्हा प्रशासनाकडून असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याचे पत्रक केले जारी केले आहे.

अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित

अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सहा प्रभागांमध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.  प्रभाग क्रमांक ५ ब आणि प्रभाग १५ ब, प्रभाग क्रमांक १७ अ, प्रभाग क्रमांक १० ब, प्रभाग क्रमांक ८ अ, प्रभाग १९ अ या प्रभागात नव्या कार्यक्रमानुसार निवडणूक घ्यावी लागणार आहे. नगरपालिका निवडणूक आता २० दिवस लांबणीवर गेली असून पूर्वी २ डिसेंबरला होणारे मतदान आता २० डिसेंबरला होणार आहे.सर्वपक्षीय उमेदवारांसह स्थानिक प्रशासनालाही धक्का बसला आहे. काही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाराच्या निकाला विरोधात न्यायालयात केले होते त्यामुळे न्यायालयाने या प्रभागाच्या आता निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर

इतर ठिकाणच्या निवडणुकीप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित बारामती नगर परिषदेची निवडणूकही लांबणीवर गेली आहे. 20 डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सर्व जागांवरती आता मतदान होईल. निवडणूक आता लांबणीवर गेल्याने कार्यकर्ते हिरमुसले आहे. त्यांना 20 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. याचिका दाखल असल्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची आणि आता या निवडणुकीची प्रक्रिया 4 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची प्राथमिक माहिती दिली. दुपारपर्यंत जिल्हाधिकारी याबाबत अधिकची माहिती देणार आहे. यासोबतच गडचांदूर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 8 ब आणि मूल नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 10 ब येथील उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केल्याने आणि याबाबत अंतिम निकाल न आल्याने येथील निवडणुका देखील पुढील निर्णयापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.

गोंदियात कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी

गोंदिया नगर परिषद येथील निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून दोन तारखेला मतदान होणार आहे. मात्र त्याच्या दोन दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने या वार्डातील काही जागांचा योग्य तारखेला न्यायालयिन निर्णय न आल्याने वॉर्ड क्रमांक 3, 11 आणि 16 यामधील एका एका जागेचा निवडणूक स्थगिती करण्याचो ठरवले. निवडणूक आयोगाचे पत्र आज सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना धडकले. त्यामुळे गोंदिया शहरातील वार्ड क्रमांक 3 मधील सर्वसाधारण ब वॉर्ड क्रमांक 11 मधील सर्वसाधारण ब आणि वार्ड क्रमांक 16 मधील सर्व साधारण ब या गटातील निवडणूक पुढे ढकलण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले. तीन वार्डातील नगरसेवक उमेदवारांचा हिरमोड झाला.

यवतमाळमध्ये सुद्धा ब्रेक?

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची ही निवडणूक लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. ज्या ठिकाणी तांत्रिक चुका झाल्या तेथे निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं नव्याने कार्यक्रम दिला असून आता निवडणुक 20 डिसेंबरला होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचे समोर आले आहे.

नांदेडमध्ये ढोल-ताशे शांत

नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली आहे. आता 23 डिसेंबरला मतदान होणार असून  24 तारखेला मतमोजणी होणार आहे. 13 नगरपालिकेपैकी 2 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तर भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील एका एका जागेवर निवडणूक पुढे ढकलली आहे. त्यामुळे येथील ढोल-ताशे सध्या शांत झाले आहेत.

मंगळवेढ्यात निवडणूक कधी?

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा नगर परिषदेची नवीन वेळापत्रकानुसार पुढीलप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.

4 डिसेंबर: जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.

10 डिसेंबर (दुपारी 3 वाजेपर्यंत): नामनिर्देश मागे घेण्याची अंतिम मुदत.

11 डिसेंबर: चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर.

20 डिसेंबर: मतदान.

21 डिसेंबर 2025: मतमोजणी