Navnath Ban: राऊतांच्या तोंडी बांग्लादेश आणि नेपाळची भाषा, नवनाथ बन यांचा गंभीर आरोप, म्हणाले सत्तांतरासाठी…
Navnath Ban on Sanjay Raut : उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले.

Navnath Ban on Sanjay Raut : निवडणुका जर गैरमार्गाने जिंकल्या असतील तर केरळमध्ये निवडणूक ही कोणत्या गैरमार्गाने जिंकली हे काँग्रेसने सांगायला हवे. केरळ, कर्नाटक, हरियाणा, झारखंड इथं तुमची सत्ता आली की तिथं निवडणूक आयोगा चांगला, सुप्रीम कोर्ट चांगलं. बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्रासह इतर राज्यात भाजप जिंकली की तुम्हाला सत्तांतर करावं वाटतं. जेव्हा कर्नाटकमध्ये सत्तांतरणासाठी आंदोलन होईल, त्याचे स्वागत संजय राऊत करणार आहेत का? झारखंडमध्ये जेव्हा विद्यार्थ्यांनी पेपर फुटीविरोधात आंदोलन केलं. तेव्हा राहुल गांधी आणि संजय राऊत यांनी आंदोलन केलं, तेव्हा मूग गिळून बसले होते. त्यांच्या तोंडात नेमका कोणी बोळा घातला होता? मग सत्तांतरणाची स्वप्न ठराविक राज्यातच का बघत आहात? तुम्ही कर्नाटक, केरळ, झारखंडमध्ये सत्तांतरणाचे स्वप्न का पडत नाही. याच निवडणूक आयोगाने ते सरकार निवडून दिलं. याच प्रक्रियेतून तुमचे सरकार आले आहे. जाणीवपूर्वक भाजपला विरोध करायचा हे संजय राऊत यांचे स्वप्न आहे. पण ते पूर्ण होणार नाही, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले.
भगतसिंग, राजगुरू हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले होते. पण संजय राऊत हे बांगलादेशची भाषा करत आहेत. नेपाळची भाषा करत आहेत. देशात अराजकता निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी लढा दिला नव्हता. दुर्दैवाने तुम्ही भगतसिंग, राजगुरू यांची तुलना अभिजीत दिपके यांच्याशी करत आहात. तुमच्या मालकाने याच अभिजीत दिपकेंची तुलना विष्णूच्या अवतारासोबत केली होती. तिरंग्याचा आणि देशाच्या अभिमानाचा संबंध आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशाचा तिरंगा वापरला याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु एक उदाहरण देतो, जेव्हा कसाब मुंबईवर हल्ला करण्यासाठी आला होता. तेव्हा कसाब ज्या बोटीवर आला होता. त्या बोटीवर सुद्धा तिरंगा फडकत होता. त्याने ज्या मुंबईकरांवर हल्ला केला. त्यांचे प्राण घेतले. त्यांचे समर्थन करायचं का? आज तुम्ही ज्या पद्धतीने तिरंगा यात्रेचे समर्थन करत आहात, त्यातून बांगलादेशासारखी आपल्याकडे जाळपोळ, नेपाळसारखा हिंसाचार, श्रीलंकेसारखा आगडोंब तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही त्या यात्रेच समर्थन केले. भाजप तिरंग्याचा स्वाभिमान, अभिमान जपते. म्हणून नरेंद्र मोदी यांनी हरघर तिरंगा अभियान राबवले होते. जेव्हा या देशात काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा सर्वसामान्यांना घरातही तिरंगा फडकवता येत नव्हता, असा आरोप बन यांनी केला.
अभिजीत दिपके यांच्यावर टीका
अभिजीत दिपके यांना पोलिसांनी अटक केली आहे. कोर्टाने त्यांना सांगितले की, तुम्ही विना परवानगी आंदोलन करत आहात. अभिजीत दिपके यांनी हमीपत्र ही दिले. एक वर्षासाठी आंदोलन करणार नाही, असे शपथपत्र दिले. तरीही त्यांनी आंदोलन केले. या देशात लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. दिपकेंनी रामलीला मैदानावर एक वर्षे आंदोलन करावं. शाहीनबागचे आंदोलन सहा महिने चाललं होते. शेतकऱ्यांचं आंदोलनही दीर्घकाळ चाललं. पण नेपाळ, श्रीलंकेसारखी अराजकता आणण्याचा प्रयत्न 140 कोटी जनता उधळून लावेल, असे नवनाथ बन म्हणाले.