‘शरद पवार यांची शेवटची निवडणूक म्हणून…’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा बोलता बोलता तोल सुटला; धक्कादायक विधानाने खळबळ

"बारामतीत त्यांना आघाडी मिळाली ती काही सुप्रिया सुळेंमुळे मिळाली नाही. सुप्रिया सुळे यांच्याकडे बघून लोकांनी मतदान केले नाही. तर पवार शरद पवारांची ही शेवटची निवडणूक आहे म्हणून लोकांनी मतदान केलं", असं धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलं.

शरद पवार यांची शेवटची निवडणूक म्हणून..., राष्ट्रवादीच्या नेत्याचा बोलता बोलता तोल सुटला; धक्कादायक विधानाने खळबळ
शरद पवार
| Updated on: Jun 12, 2024 | 9:26 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून खासदार सुप्रिया सुळे उमेदवार होत्या. तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. या निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांचा तोल सुटला आणि ते वेगळंच काहीतरी बोलून गेले. “बारामतीत त्यांना आघाडी मिळाली ती काही सुप्रिया सुळेंमुळे मिळाली नाही. सुप्रिया सुळे यांच्याकडे बघून लोकांनी मतदान केले नाही. तर पवार शरद पवारांची ही शेवटची निवडणूक आहे म्हणून लोकांनी मतदान केलं”, असं धक्कादायक वक्तव्य उमेश पाटील यांनी केलं.

“आता सुप्रिया सुळे यांना ५ कोटी रूपये खासदार निधी मिळेल. त्याशिवाय काही मिळणार नाही. त्यामुळे खड्ड्यांच्या सेल्फी काढत बसतील. प्रश्न विचारणे एवढेच काम नाही. तर ते सोडवणे हे काम आहे. त्यासाठी केंद्राकडून निधी लागतो. त्यासाठी सत्ता लागते. हेच आम्ही सांगतो”, असं वक्तव्य उमेश पाटील यांनी केलं.

उमेश पाटील यांचा रोहित पवारांवर निशाणा

उमेश पाटील यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावरदेखील टीका केली. “रोहीत पवार यांना मुख्यमंत्री व्हायची घाई झाली आहे. झेडपी संपत नाही. तर त्यांना आमदार व्हायचे होते. आता आमदार होत नाही तर मंत्रीपद हवे होते. ते मिळत नाही म्हणून भाजपमध्ये जाणार होते. आता त्यांच्यात आतमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. ती उघड होऊ लागली आहे”, अशी टीका उमेश पाटील यांनी केली.

उमेश पाटील बजरंग बाप्पा यांच्याबद्दल काय म्हणाले?

“खासदार बजरंग बाप्पा आता रोहीत पवार यांनी जे बोलायला सांगितले आहे ते बोलत आहेत. स्वत: पंकजाताईंना माहिती आहे की, धनंजय मुंडे हे खूप त्वेषाने लढले. पंकजाताईंना माहिती आहे, त्यांच्यापेक्षा जास्त त्वेषाने ते लढले. येत्या काळात बजरंग सोनवणे हे आमच्या बरोबर येऊन बसले तरी आश्चर्य वाटून घेऊ नका”, असं वक्तव्य उमेश पाटील यांनी केलं.

“शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे विधान लक्ष देऊन ऐकले पाहीजे. जे आम्ही बोलत होतो तेच ते सांगत आहे. भाजप बरोबर जाण्याचा निर्णय अनेकवेळा घेण्यात आला होता. अजितदादांना विलन बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे आमदार आले ते शरद पवारांना डावलून आले असे सांगितले जाते”, असं उमेश पाटील म्हणाले.

“राज्यसभेत कुणला पाठवणार याबाबत लवकरच नाव निश्चित होईल. आमच्याकडे सगळं आलबेल आहे. वक्तव्ये येत राहतात. काही ठिकाणी जर चर्चा असेल तर समन्वय समितीकडे जाईल आमच्यात काही वाद नाही. भाजप सहमत असेल असे मला वाटत नाही. हेमंत विश्वशर्मा यांना बाहेरून घेतले आणि मुख्यमंत्री केले तिथे यश आले. विरोधक विषय शोधत असतात.आर्गनाझर हे काही आरआरएसचे मुखपत्र नाही. त्या विचारधारेचे ते आहेत. भाजपच्या समन्वय समितीमध्ये आमच्या पक्षावर कोणतीही टीका करण्यात आली नाही”, असा दावा उमेश पाटील यांनी केला.

Follow Us