राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शरद पवार यांच्याकडे नवा प्रस्ताव, काय आहे प्रस्ताव?; पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष

| Updated on: May 03, 2023 | 1:37 PM

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज दुपारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहेत. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा शरद पवार यांच्याकडे नवा प्रस्ताव, काय आहे प्रस्ताव?; पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
Sharad Pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व्यथित झाले आहेत. पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाची आणि तातडीची बैठक सुरू आहे. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी ही बैठक होत आहे. पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची गळ या बैठकीत घालण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वत: आजच्या बैठकीला उपस्थित आहेत. यावेळी अजित पवार, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला हजर होते. यावेळी शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावं अशी गळ पक्षाच्या नेत्यांनी पवार यांना घातली आहे. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे नवा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार शरद पवार यांनी राज्यसभेची टर्म संपेपर्यंत तरी अध्यक्षपदी राहावं, अशी मागणी करण्यात आली आहे. शरद पवार यांची तीन वर्षाची राज्यसभेची टर्म बाकी आहे. त्यामुळे ही टर्म पूर्ण करेपर्यंत पक्षाचं नेतृत्व करावं असं या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यावर आता पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटलांना फोन

आज चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलच नव्हते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं. शरद पवार यांच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्यांनी जयंत पाटील यांना फोन केला. त्यांना तातडीने मुंबईत येण्यास सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर पक्षाची बैठक आहे हे मला माहीतच नव्हतं. मला कुणी सांगितलं नाही. त्यामुळे मी पुण्यात आलो होतो, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. जयंत पाटील यांना बैठकीचं निमंत्रण न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तो फॉर्म्युला अमान्य

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केंद्रात लक्ष घालावं आणि अजित पवार यांनी राज्यात लक्ष घालावं असं ठरताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तसा फॉर्म्युला दिला आहे. पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा फॉर्म्युला धुडकावून लावला आहे. केंद्रात ताई आणि राज्यात दादा हा निर्णय कार्यकर्त्यांना मान्य नाही. हे कार्यकर्ते वाय बी चव्हाण सेंटर येथे जमले आहेत. बैठक सुरू झाली असली तरी कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि शरद पवार यांच्याच नेतृत्वात आम्हाला काम करायचं आहे. इतर नेतृत्व नकोच, असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. शरद पवार यांना आम्ही निर्णय बदलण्यास भाग पाडू, असंही त्यांनी म्हटलं आहे.