विधान परिषदेवर कुणाची वर्णी? देवगिरीवरील बैठकीत मोठी खलबत, राष्ट्रवादीचा चेहरा कोण?

Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे चेहरा असू शकतात. तर भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला आहे. शिंदे सेनेसह राष्ट्रवादीत अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे, कोण असणार राष्ट्रवादीचा चेहरा?

विधान परिषदेवर कुणाची वर्णी? देवगिरीवरील बैठकीत मोठी खलबत, राष्ट्रवादीचा चेहरा कोण?
राष्ट्रवादी काँग्रेसची देवगिरीवर खलबतं
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 29, 2026 | 10:32 AM

NCP Meeting on Devgiri : विधान परिषद निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. महायुतीमध्ये भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग करत सहा उमेदवार जाहीर केले आहेत. शिंदे सेनेचा चेहरा अजून ठरायचा आहे. तर दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीत एका जागेसाठी अनेक इच्छुक असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने रात्री उशिरा बैठक पार पडली. आताही देवगिरी बंगल्यावर खलबतं सुरू आहेत. अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून असताना कुणाच्या गळ्यात विधान परिषदेची माळ पडणार याची चर्चा सुरू आहे.

देवगिरी बंगल्यावर खलबतं

काल रात्री उशारी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली. रात्री ११ ते २ पर्यंत देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.बैठकीला माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे देखील उपस्थित होते. विक्रम काकडे खासदार पार्थ पवार यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला पक्षात सध्या प्रचंड विरोध होत असल्यामुळे अन्य नावांबाबत देखील बैठकीत खल झाल्याचे समजते.

आज सकाळी पुन्हा चर्चा

संजय काकडे यांच्या नावाला विरोध झाल्यानंतर पक्षातून राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, जिशान सिद्धकी यांच्या नावांबाबत देखील चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. रात्री उशिरा चर्चा पार पडल्यानंतर आज सकाळी देवगिरी निवासस्थानी पुन्हा बैठक सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील हे देवगिरी बंगल्यावर बैठकीसाठी पोहचले आहेत मंत्री हसन मुश्रीफ हे बैठकीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. सर्वच नेते बैठकीला हजर आहेत. पार्थ पवार सुद्धा बैठकीला हजर आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रवादीचा विधान परिषदेचा चेहरा कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीकडूनही धक्कातंत्र?

देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसची विधान परिषदेचा चेहरा ठरवण्यासाठी बैठक सुरू आहे. त्याचवेळी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे या देवगिरीवर पोहचल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. सुनील तटकरे यांनी आताच माध्यमांशी बोलताना अनेक इच्छुक आहेत. ७० ते ७५ जण इच्छुक असल्याचे आणि संध्याकाळी याविषयी निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  भाजपने पुन्हा धक्कातंत्र वापरत पाच नवीन चेहऱ्यांना विधान परिषदेसाठी संधी दिली. तसेच धक्कातंत्र राष्ट्रवादी काँग्रेस देणार का याची चर्चा होत आहे.

Follow Us