शरद पवारांशी जवळीक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी भाजपचा गजर? काय राजकीय समीकरण?
NCP Merger Politics: राज्याचे राजकारण पुन्हा कूस बदलण्याची चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच दोन्ही राष्ट्रवादीचे नेत्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. पण त्यातून विलीनीकरणाचीच चर्चा अधिक रंगली. दोन्ही पक्षाच्या एकत्रिकरणासाठी भाजपने फिल्डिंग लावली आहे का?

NCP Merger Politics: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पुन्हा एकदा गजर सुरू झाला. राज्याचे राजकारण कूस बदलण्याची जोरदार चर्चा सुरू झाली. दोन्ही बाजूने विलीनीकरणाचे कार्ड पुन्हा फेकण्यात आले. त्यावर खमंग, खुशखुशीत चर्चा रंगली. ऐन दिवाळीत आरोप-प्रत्यारोपांची लड लागली. तर दाव्या-प्रतिदाव्यांचे बॉम्ब फुटले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अगोदर पुण्यातील रूबी आणि नंतर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यावेळी प्रफुल पटेल यांनी त्यांची भेट घेतली आणि विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले. दोन्ही पक्षाच्या एकत्रिकरणासाटी भाजपने फिल्डिंग लावल्याचाही सूर उमटत आहे.
पीएम मोदींचा फोन आणि दिल्लीतील भेटींचे सत्र
पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन केला. तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. सुप्रिया ताई आणि आम्ही देश सांभाळू असे ते म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य सूचक असल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली. त्याच अगोदर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अजित पवार गटाच्या शिष्टमंडळाने दिल्लीत भेट घेतली. हा सर्व एकाच राजकीय साखळीचा भाग असल्याचे मानले जात आहे. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेला ब्रेक लावण्यासाठी भाजपने प्रादेशिक पक्षांना बळ देण्याची खेळी खेळल्याचा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत.
हिवाळी अधिवेशनासाठी संख्याबळाचे गणित
राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू अथवा मित्र नसतो. राजकारणात कोणतीही गोष्ट कायमस्वरुपी नसते असे म्हणतात. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण या सारख्या महत्त्वाच्या विधेयकांसाठी भाजपप्रणीत एनडीएला 36 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. विविध राज्यातून हा टप्पा गाठण्याचा प्रयत्न आहे. हे संख्याबळ वाढवण्यासाठीच भाजप धोरणात्मक खेळी खेळत असल्याचा दावा करण्यात येत आहे. उन्हाळी अधिवेशनात भाजपला या दोन्ही विधेयकावरून मोठा झटका बसला होता. गेल्या १२ वर्षात सरकारचे एकही विधेयक पडले नव्हते. पण यंदा विरोधकांनी एकजूट दाखवल्याने भाजपने आता रणनीती बदलल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील राजकारणावर मजबूत पकड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपला त्याचा मोठा फायदा होईल. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर दूरगामी परिणाम होतील. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनालाही मोठा चेकमेट देता येणार आहे. राष्ट्रवादी मजबूत झाल्यास भाजपचे एक पारडे मजबूत होईल. शिंदे सेनेच्या दबावतंत्राला राष्ट्रवादीच्या रूपाने उत्तर देण्याचा प्रयत्न होईल. अर्थात या सर्व चर्चा सुरू असतानाच अंतिम निर्णय शरद पवार यांचाच असणार आहे. त्यामुळे पवार हे कोणती पॉवर दाखवतात यावरच राजकारणाची दिशा ठरणार आहे.