Explainer : 2 भेटी, एक फोन अन् राष्ट्रवादीत चक्रे फिरली, विलिनीकरणाच्या चर्चे मागची इन्साइड स्टोरी

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दाव्यानुसार, अजितदादा गटाच्या नेत्यांनी शरद पवार गटाशी विलिनीकरणाच्या बैठका घेतल्या होत्या. विधान परिषदेतील पराभव, अमित शहा आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटी, तसेच पंतप्रधानांच्या फोननंतर या चर्चांना जोर आला आहे.

Explainer : 2 भेटी, एक फोन अन् राष्ट्रवादीत चक्रे फिरली, विलिनीकरणाच्या चर्चे मागची इन्साइड स्टोरी
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 4:38 PM

अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज एक नवीन बॉम्ब फोडून खळबळ उडवून दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बैठका झाल्या होत्या. अजित पवार यांनी मला त्याची कल्पना दिली होती, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या आठ दिवसात राष्ट्रवादीत घडलेल्या चार घटनांमुळे तटकरे यांनी विलिनीकरणाचं भूत उकरून टायमिंग साधल्याचं बोललं जात आहे. या चार घटना म्हणजे विधान परिषदेतील पराभव, दोन राजकीय भेटी आणि एका सर्वोच्च नेत्याचा फोन. या चार घटनांमुळे राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी घडत असल्याचं बोललं जात आहे. काय आहेत या घटना?

विधान परिषदेत पराभव

राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अजितदादा गटाचा दणकून पराभव झाला आहे. तर शरद पवार गटाला या निवडणुकीत 100 टक्के यश मिळालं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या गटावर राज्यातील जनतेचा विश्वास असल्याचं अधोरेखित झालं आहे. तर अजितदादा गटात नेतृत्वाची पोकळी असल्याचं उघड झालं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाला नेटाने पुढे नेणारा आणि राजकीय स्ट्रॅटेजीत उजवा असलेला नेताच राष्ट्रवादीत उरला नसल्याचंही उघड झालं आहे. या निवडणुकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून नेतृत्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत सक्षम नेतृत्त्व असल्याशिवाय पक्षाला चांगले दिवस येणार नाहीत, नाही तर पक्ष विखरायला वेळ लागणार नाही, असं अजितदादा गटातील नेत्यांना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Loading...

पहिली भेट

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्ही विलिनीकरणाची चर्चा करणार नाही, अशी हमीच या नेत्यांनी अमित शाह यांना दिली होती. तसेच या नेत्यांनी पार्थ पवार यांच्या पक्षातील वाढत्या हस्तक्षेपावर अमित शाहांकडे तक्रारही केली होती, असं सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि समीर भुजबळ यांनी शाह यांची भेट घेतली होती. यावरून राष्ट्रवादीत सर्व काही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर लगेचच तटकरे यांनी विलिनीकरणावर भाष्य केल्याने तटकरे यांच्या या विधानाला शाह यांच्या भेटीशी जोडून पाहिलं जात आहे.

एक फोन

शरद पवार हे पुण्यतील रुबी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला. मोदींनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला. तसेच सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळतो. तुम्ही काळजी करू नका. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही ठणठणीत बरे व्हा, असं मोदी पवारांना म्हणाले. मोदी यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहे. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळतो असं मोदी थेट म्हणाले. त्यामुळे पवार एनडीएसोबत जाणार आहेत का? त्यापूर्वी राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे.

दुसरी भेट

पवार मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर काल प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेतली. त्यांच्याशी तासभर चर्चा केली. 10 तारखेला भेटू, असं पवारांनी पटेलांना सांगितलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. 10 तारखेला नेमकं काय होणार आहे? पटेल हे दुसऱ्या पक्षात असताना आणि पवार स्वत: आजारी असताना त्यांनी पटेलांशी अशा कोणत्या विषयावर चर्चा केल्या? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर तर चर्चा झाली नाही ना? विलिनीकरणाचा फॉर्म्युला तर ठरला नाही ना? अशी चर्चा सुरू असतानाच पटेल यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे यांनी विलिनीकरणावर भाष्य करून मोठे राजकीय संकेत दिले आहेत. येत्या 10 तारखेनंतरच हे राजकीय संकेत काय आहेत? कोणत्या घडामोडी घडणार आहे? हे स्पष्ट होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us