ना लोढा, ना देवरा, अहिर सुद्धा नाही… 2029 मध्ये दक्षिण मुंबईतून NDA चा लोकसभा उमेदवार कोण? तो लोकप्रिय चेहरा समोर… सोशल मीडियावर दाव्यांचा पूर
South Mumbai Constituency NDA Lok Sabha Candidate 2029 : सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत उडी घेत विधान परिषद उपसभापती पद मिळवलं. आता दक्षिण मुंबईत 2029 मध्ये लोकसभेचा कोण उमेदवार असेल याची मोर्च बांधणी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या नावाची तुफान चर्चा सुरू झाली आहे.

Warli NDA Lok Sabha Candidate 2029 : वरळीत भाजप आणि शिंदे सेनेने मोठा खेला केला. विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आमदार सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत उडी घेतली. त्यांचा लागलीच विधान परिषदेचे उपसभापती पदी वर्णी लागली. आता वरळी विधासभा मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईचा खासदार कोण असेल याची तुफान चर्चा सुरू आहे. मंगल प्रभात लोढा, मिलिंद देवरा, सचिन अहिर यांचे नाव स्पर्धेत कुठेच नाही. तर क्रिकेटमधील या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस पडला आहे.
लोकसभेसाठी NDA ची आतापासून मोर्चेबांधणी
लोकसभा निवडणूक अजून दूर आहे. पण NDA ने दक्षिण मुंबईसाठी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. समित ठक्कर यांनी सोशल मिडिया खाते X वर एक पोस्ट केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 2029 मध्ये दक्षिण मुंबईतून NDA चा खासदार निवडून येईल. पण मिलिंद देवरा, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, यामिनी यशवंत जाधव अथवा सचिन अहिर यापैकी तो नसेल, असा दावा त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.
आपल्या सूत्रांची माहिती अचूक असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार निश्चित केला आहे. एक संकेत देतो, या उमेदवाराला क्रिकेटमध्ये विशेष रस आहे. ते वरळीचे स्थानिक रहिवासी आहेत. त्यांचा वसई-विरारशी संबंध आहे. जानेवारी 2027 पासून तुम्हाला 2029 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी झालेली दिसेल असा दावा या ट्विटमध्ये समित ठक्कर यांनी केला आहे.
कोण आहे तो चेहरा?
आता राजकारणातील हा नवीन चेहरा कोण अशी विचारणा होऊ लागली. ठक्कर यांच्या ट्विटचा आधार घेत कालभैरव या नावाच्या प्रोफाईलरून ग्रोक कडे याविषयीची विचारणा करण्यात आली. त्यानंतर ग्रोकने जे उत्तर दिले ते अचंबित करणारे होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक हे ती व्यक्ती असल्याचा ग्रोकचा दावा आहे.
ग्रोककडील माहितीनुसार, नाईक हे मुंबई क्रिकेटचा कारभार हाकतात. वरळी स्पोर्टस क्लबमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करतात. वरळी आणि दक्षिण-मध्य मुंबईत ते सक्रिय आहेत. त्यामुळे आता अजिंक्य नाईक हे 2029 मधील दक्षिण मुंबईतून एनडीएचा चेहरा असतील का, याची चर्चा सुरू झाली आहे.