स्वराज्याचा ठेवा चित्ररुपात, अवलिया चित्रकाराची 110 गडकिल्ल्यांची पायपीट

| Updated on: Mar 11, 2020 | 12:44 AM

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक ठेव्यांमध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांना वेगळेच महत्त्व आहे (Painter Haresh Paithankar visit 110 Forts)

स्वराज्याचा ठेवा चित्ररुपात, अवलिया चित्रकाराची 110 गडकिल्ल्यांची पायपीट
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक ठेव्यांमध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांना वेगळेच महत्त्व आहे (Painter Haresh Paithankar visit 110 Forts). हे अभेद्य आणि अजेय किल्ले आजही मराठेशाहीच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. हाच ऐतिहासिक ठेवा चित्रकार हरेष पैठणकर यांनी ‘रंग सह्याद्री’ या संकल्पनेतून चित्रस्वरुपात सर्वांच्या भेटीला आणला आहे. मुंबई येथील जंहागीर आर्ट गॅलरी येथे 9 ते 15 मार्च दरम्यान हा ठेवा प्रदर्शन स्वरुपात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात साडेतीनशेहून अधिक गड-किल्ले आहेत. यातील 100 हून अधिक गड-किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास त्यांनी आपल्या चित्रातून मांडला आहे.

चित्रकार हरेष पैठणकर हे मागील 10 वर्षांपासून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यावर भटकंती करत आहेत. त्यांची ही भटकंती 2007 ते 2008 सालापासून सुरु आहे. राज्यातील 13 जिल्ह्यातील जवळपास 100 गड-किल्ल्यांची चित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. हरेष यांनी आतापर्यंत 115 ते 116 गड-किल्ल्यांची पायी भटकंती केली आहे.

महाराष्ट्राचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचवा हा हेतू

महाराष्ट्राला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशा ऐतिहासिक वारसांमधून आपल्या महाराष्ट्राच्या पराक्रमाची, लढवय्या बाण्याची ओळख पटते. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेले गड-किल्ले बघितले तर ही ओळख जास्त अधोरेखित होते. वर्षानुवर्षे अंगावर ऊन, पाऊस, वारा झेलत हे गड-किल्ले आजही सक्षमपणे उभे आहेत. मात्र, काळाच्या ओघात आता या ऐतिहासिक गड-किल्ल्यांपैकी काही गड-किल्ल्यांची पडझड सुरु आहे. या गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे आता गरजेचे आहे. त्यामुळेच हे चित्रप्रदर्शन भरवल्याचं मत हरेष पैठणकर यांनी व्यक्त केलं.

आजोंबामुळे चित्रकलेची आवड : हरेष पैठणकर

आम्ही मुळचे पेण या ठिकाणचे असून आमच्या घरी गणेशशाळा होती. त्यामुळे मला लहानपणापासून कलाक्षेत्राची आवड लागल्याचं हरेष पैठणकर यांनी सांगितलं. पुढे चित्रकलेची आवड लागल्यानं पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून चित्रकलेचं शिक्षण घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

हरेष पैठणकर यांची यापूर्वीची चित्रप्रदर्शने

2003 रुपेरी वाळूवर कोकण दर्शन
2008 अजंठा आणि वेरूळ येथील शिल्पांचे चित्रप्रदर्शन(बालगंधर्व, पुणे आणि मुंबई)
पुण्यातील ऐतिहासिक जुने वाड्यांचे चित्रप्रदर्शन

Painter Haresh Paithankar visit 110 Forts