Rahul Gandhi: हा तर दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा…गोकुळच्या वादात राहुल गांधी यांची उडी, “4 संचालक घुसवा, 12 चे 16 करा आणि…”
Rahul Gandhi on Gokul Five Directors: गोकुळ कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाच्या वादात आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. निवडणुकीनंतर नियम बदलल्यावरून त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Rahul Gandhi on Gokul Five Directors: गोकुळ, कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीनंतर नियमातील बदलावरून मोठे वादळ उठले आहे. राज्य सरकारने गोकुळमध्ये पाच संचालक नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने टीकेची झोड उठवली. आता लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यांनी भाजपवर कडकडून हल्ला चढवला आहे. समाज माध्यमावर त्यांनी एक पोस्ट लिहित याविषयीची भूमिका मांडली आहे. त्यांनी काँग्रेस नेते पवन खेरा यांचे पोस्ट रीट्विट करत भाजपवर सडकून टीका केली आहे.
भाजपवर राहुल गांधी यांची सडकून टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोकुळ दूध उत्पादक प्रकरणात भाजपवर निशाणा साधला. “गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. त्यानंतर भाजपने नियमच बदलले. 4 संचालक जबरदस्तीने घुसवा, 12 चे 16 करा आणि बहुमत चोरून घ्या. हा दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा आहे. ही तर जनादेशात केलेली भेसळ आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजप इतकी हताश झाली आहे की, कोणत्याही थराला जाऊ शकते. दूध उत्पादकांची मतं चोरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की शेतकरी हे कधीही विसरत नाहीत.” असा सणसणीत टोला राहुल गांधी यांना या पोस्टमधून हाणला.
सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार- पवन खेरा
महाराष्ट्र सरकारने गोकुळ दूध संघात दूध उत्पादकांच्या संचालक मंडळाची रचना बदलण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पॅनलने 25 पैकी 13 जागांवर बहुमत आणले तर महायुतीने 12 जागांवर जिंकल्या. मुंबई उच्च न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी नवीन निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाने चार शासकीय संचालकांना मतदानाचा हक्क देऊन नामनिर्देशित करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यामुळे निवडणुकीचे गणित बदलू शकते आणि दूध उत्पादकांनी दिलेला कौल डावलल्या जाऊ शकतो. निवडणुकीचा निकाल आपल्या बाजूने लागला नाही म्हणून एखादे सरकार निवडणुकीनंतर नियमात बदल करू शकते का? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढा देणार आहोत, असे ट्वीट काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
19 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत गोकुळ निवडणुकीत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 13 तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वातील राजर्षि शाहू विकास आघाडीने 12 जागांवर विजय मिळवला. गोकुळच्या नियमानुसार, 25 पैकी 14 सदस्य सभेस उपस्थित असतील तरच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड होऊ शकते. त्यातच राज्य सरकारने एक मोठा डाव खेळला. गोकुळमध्ये पाच संचालक नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची समीकरणं बदलू शकतात. त्यावरून वाद उफळला आहे.