Breaking Marathi News : राज ठाकरे विश्वनेते, भाजपने पोपट पाळले; संजय राऊत यांनी उडवली खिल्ली

कोरोना काळातील ढिसाळपणावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Breaking Marathi News : राज ठाकरे विश्वनेते, भाजपने पोपट पाळले; संजय राऊत यांनी उडवली खिल्ली
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 21, 2023 | 10:43 AM

मुंबई : कोरोनाच्या काळातही ढिसाळ नियोजन झालं होतं. त्यामुळे त्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्या कारभारावर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. भाजपने काही पोपट पाळले आहेत. ते बोलत असतात. राज ठाकरे हे विश्वनेते आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.

भाजपने एवढे पोपट पाळून ठेवले आहेत. त्यांना बोलू दया. पोपटपंची करू द्या. नोटबंदीच्या रांगेत हजारो लोक मेले हा सदोष मनुष्यवधच आहे ना. त्यावरही या भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा. गंगेत हजारो प्रेते वाहत आली. गुजरातला स्मशानात जागा नव्हती. मग गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागण राज ठाकरे यांनी करायला हवी. ते जगाचे नेते आहेत. ते ट्रम्पवरही बोलू शकतात. करा मागणी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

काय मागण्या करता?

काय मागण्या करता? कुणासाठी करता? खारघरला लोकं तडफडून मेले. बाजूला मेजवाण्या सुरु होत्या. पण लोकांना प्यायला पाणी नव्हते. त्यावर बोला. ढिसाळ नियोजनावर बोला. कशा करता सर्व कार्यक्रम केला त्यावर बोला. उठसूट उद्धव ठाकरे… उद्धव ठाकरे… सुरू आहे. झोपेतही उद्धव ठाकरे आणि जागेपणी उद्धव ठाकरेच सुरू आहे, असे चिमटेही त्यांनी काढले.

राजकीय चर्चा तर होणारच

संजय राऊत यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवार यांच्याशी भेट झाली. पण तुम्ही आधीच्या भेटीचा संदर्भ देता त्याचा या भेटीशी संबंध नाही. राजकीय चर्चा निश्चित झाली. दोन व्यक्ती भेटल्यावर चर्चा होतच असते. तशी यावेळीही चर्चा झाली, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.