
हिंदी भाषा सक्तीविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. आज गुरूवारी, 26 जून रोजी दोन्ही ठाकरेंनी सरकारविरोधात मैदानात उतरण्याचा फैसला स्वतंत्रपणे जाहीर केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज स्वतंत्र पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीविरोधात रणशिंग फुंकले. गेल्या दोन महिन्यांपासून दोन ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी महाराष्ट्र जणू पिंजून काढला आहे. हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधुनी एकाच दिवशी रणशिंग फुंकले आहे. त्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार का, या प्रश्नाला असे थेट उत्तर दिले.
हा मराठीपण घालवण्याचा कटच
हा जो कट आहे, याला कटच म्हणेल. महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी हा कट आहे, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केला. हा कट उद्ध्वस्त करण्यासाठी मराठी बांधवांनी भगिनींनी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावं ही विनंती आहे. या मोर्चात कोणताही झेंडा नसेल. मराठी हा अजेंडा असेल. या अजेंड्यासाठी मराठी माणसांनी सहभागी व्हावं. सरकारला दाखवावं. साहित्यिक एलकुंचवार यांनीही विरोध केला आहे. राजकीय पक्षांव्यतिरिक्त कोण कोण सामील होतात हे पाहायचं आहे. कोण येणार नाही हेही मला पाहायचं आहे. नुसतंच तोंडदेखले बाकीचे बोलत असतात. ही महत्त्वाची लढाई आहे. या लढाईत संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं. ६ तारखेला सकाळी १० वाजता गिरगाव चौपाटीवरून मोर्चा निघेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार
या मोर्चासाठी मनसे पक्ष, संघटनांशी बोलणार आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी तुम्ही बोलणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरेंशी बोलणार. आमची माणसं त्यांच्या माणसाशी बोलणार असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले. इतक्या दिवस मी जे बोलत होतो ना, कोणत्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. ते तुम्हाला ६ तारखेला कळेल, असे सूचक वक्तव्य सुद्धा त्यांनी केला. त्यामुळे ६ जुलै रोजी राज्यात भाषिक अस्मितेसाठी दोन ठाकरे एकत्र येतील का? असा सवाल समोर येत आहे.
गिरगाव चौपटीवरून मोर्चा
६ तारीख गंमत म्हणून निवडली नाही. पालक, विद्यार्थी आणि इतरांना शक्य होईल. रविवार, सुट्टी असल्याने सर्व येतील, असे राज ठाकरे म्हणाले. हिंदी सक्तीविरोधात मनसे ६ जुलै रोजी मोर्चा काढणार आहे. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा निघेल. अनेक लोक बोलत असतात मोक्याच्यावेळी येत नाही. त्यात कलावंतही असतील. माझं बोलणं झाल्यावर सर्व येतील. विठ्ठलाला साकडं घालू सरकारला सुबुद्धी देवो, असे राज ठाकरे म्हणाले.