Rohit Pawar: मैत्रीत आंधळं होऊन दुर्योधनाला… रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना मोठा टोला, MPSC शी कनेक्शन काय?

Rohit Pawar criticized Devendra Fadnavis: MPSC च्या औषध निरीक्षक पेपर फुटीप्रकरणात काल चार जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Rohit Pawar: मैत्रीत आंधळं होऊन दुर्योधनाला... रोहित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना मोठा टोला, MPSC शी कनेक्शन काय?
रोहित पवार, देवेंद्र फडणवीस
| Updated on: Sep 26, 2026 | 9:57 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक प्रश्न पत्रिका फुटीप्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी रान पेटवलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या आंदोलनाला हवा दिली आहे. त्यांनी सीबीडी बेलापूर येथील एमपीएससी कार्यालयाबाहेर आंदोलनही केले होते. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना मुख्यमंत्री का वाचवत आहेत, असा सवालही रोहित पवार यांनी विचारला होता. या पेपरफुटीप्रकरणात काल चार जणांना अटक करण्यात आली. त्यावरून पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सत्य दडपण्याचा कितीही प्रयत्न करा…

MPSC च्या औषध निरीक्षक परीक्षेत पेपर फोडणारे रॅकेट राज्यभर असून, आम्ही स्वतः शंभरहून अधिक नावं दिली होती. परंतु आयोगाने मात्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी एकजुटीचा परिणाम दिसत असून, अखेर आज आणखी चार घोटाळेबाजांना अटक झाली आहे. सुरुवातीला एकाच उमेदवाराला फायदा झाल्याचं सांगणारे भ्रष्ट अध्यक्ष आज पुन्हा उघडे पडले आहेत. सत्य दडपण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही. भ्रष्ट अध्यक्षांचा क्रूर चेहरा समोर आणूच, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

दुर्योधनाला पाठीशी घालू नका

तर या पेपरफुटीप्रकरणात रोहित पवार यांनी मोठा निशाणा साधला आहे. “विशेष म्हणजे, आज अटक झालेले दोन उमेदवार COMBINE 2025 MAINS च्या मेरिट लिस्टमध्ये देखील आहेत. हा गोंधळ खूप मोठा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तत्काळ आयोग बरखास्त करून क्लीनअप करा. विषय गंभीर आहे. कर्णासारखं मैत्रीत आंधळं होऊन दुर्योधनाला पाठीशी घालू नका.” असा खरमरीत टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आणखी चार जणांना अटक

MPSC औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आणखी चार जणांना काल अटक करण्यात आली. दोन उमेदवारांसह दोन मध्यस्थांना अशी एकूण चार जणांना अटक करण्यात आली. औषध निरीक्षक पेपरफुटीतील अटक आरोपींची संख्या आता ११ वर पोहचली आहे. मुख्य आरोपींकडून प्रश्नपत्रिका मिळवून उमेदवारांना देऊन आर्थिक फायदा मिळवण्याचा आरोप करण्यात आला आहे.

सांगलीतून साजिद सांदे, आणि बुलढाणा येथून विजय केंगरला अटक करण्यात आली आहे. संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम हे दोन मध्यस्थी असून यांनी प्रश्नपत्रिका मिळवून दोघाना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तांत्रिक तपासातून ऋतुजा पाटील एकमेव नसून आणखी दोन लाभार्थी असल्याचे समोर आले आहे. यामुळे या पेपरफुटीची व्याप्ती आता वाढल्याचे समोर आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us