भुजबळ, केजरीवाल नाही, मग मफलरवाला तो नेता कोण? रोहित पवार यांचा गौप्यस्फोट काय?
येत्या 10 तारखेचं सादरीकरण हे टेक्निकल नाही. यावेळी वृत्ती, प्रवृत्ती कशी हे सांगणार आहे. एआयबीचा रिपोर्ट आल्यावर मी टेक्निकल सादरीकरण करेल. 10 ऑक्टोबरला कंपनी, कंपनीचे व्यवहार आणि त्यांना कोण आणि कसं वाचवतंय याचे पुरावे देईन, असं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार म्हणाले.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात व्हिएसआर कंपनीला एक नेता वाचवत आहे. मफलर घालणारा हा नेता आहे. मफलर घालणारा नेता म्हणजे छगन भुजबळ आणि अरविंद केजरीवाल नाही. भुजबळ आणि केजरीवाल यांचा या केसशी काहीही संबंध नाही. मफलरवाला नेता दुसराच असून येत्या 10 ऑक्टोबर रोजी या नेत्याचं नाव जाहीर करून पर्दाफाश करण्यात येणार आहे, असा इशाराच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे मफलरवाला हा नेता कोण? याचं गूढ वाढलं आहे.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजितदादांच्या अपघाती निधनावर मोठा गौप्यस्फोट केला आहे. दादांना जाऊन आठ महिने झाले आहेत. सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. सीआयडी आणि सरकारकडून तपास केला जात नाही. सरकारला वाटतं लोकं विसरले. अजितदादांना लोकं विसरणार नाहीत. अजितदादा असते तर त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली असती. त्यांनी विलंब केला नसता. दादा नसल्याने सामान्य शेतकरी आणि मजदूरांचं नुकसान झालं आहे, असं सांगतानाच पॉवरफुल्ल लोकांना वाटत असेल आम्ही शांत बसलोय. पण तसं नाही. मफलर हे कारण आहे. मफलरच्या मागे एक चेहरा आहे. त्या चेहऱ्याचं नाव आम्ही जाहीर करू. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पर्दाफाश करण्यात येणार आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं.
तो नेता दुसराच…
मफलर वापरणारा हा नेता कोण आहे? अरविंद केजरीवाल की छगन भुजबळ? असा सवाल रोहित पवार यांना करण्यात आला. त्यावर भुजबळ आणि केजरीवाल या दोन्ही नेत्याचा या केसशी संबंध नाहीये. मफलरवाला नेता दुसराच आहे. एका कार्यक्रमात या नेत्याने डिझाईनचा मफलर घातला होता. त्याचं नाव आम्ही जाहीर करणार आहोत. त्याचा फोटोही दाखवणार आहोत. अजितदादांच्या अपघाताला जबाबदार असलेल्या व्हिएसआर कंपनीला आणि या कंपनीला वाचवणाऱ्या व्यक्तीला हा मफलरवाला नेता वाचवत आहे. सत्तेचा वापर करून या लोकांना तो वाचवत आहे. त्याचं नाव मी येत्या 10 ऑक्टोबर रोजी जाहीर करणार आहे, असं रोहित पवार म्हणाले.
माझे लोकच माझं संरक्षण…
हा बडा नेता आहे. त्यामुळे लोक मला तुमच्या जीवाची काळजी घ्या म्हणून सांगत आहेत. माझे लोकच माझं संरक्षण करतील. माझ्या प्रेझेंटेशनच्या अनेक कॉपी मी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या आहेत. जीव धोक्यात असला तरी आपल्या लोकांना न्याय देण्याची आपलीच जबाबदारी आहे. आपण आपल्या माणसाला न्याय देणार नसू तर गरीब आणि सामान्यांना काय न्याय देणार? असा सवाल त्यांनी केला.
सीआयडीवर संताप
अजितदादा प्रकरणात विशिष्ट पद्धतीने प्लान केला गेला. दादा गाडीने जाणार होते. त्यांना उशीर का झाला? विमानात काय काय घडलं हे मी सांगितलं. ब्लॅक बॉक्स दाबण्याचा प्रयत्न सुरू होता. ब्लॅकबॉक्सला काहीच झालं नाही हे आम्ही सांगितलं. ते खरं ठरलं. आता ब्लॅकबॉक्सची शहानिशा सुरू आहे. कॅनडा आणि यूएसएला ब्लॅकबॉक्स पाठवा ही आमची मागणी होती. त्यानुसार ते करण्यात आलं आहे. सीआयडीवर आमचा विश्वास होता. पूर्वीची सीआयडी खूप चांगलं काम करत होती. पण आता सीआयडी एआयबीच्या रिपोर्टची वाट पाहत आहे.. टेक्निकल आणि क्रिमिनिल तपास काय हे सीआयडीला कळत नाही. ते काय तपास करणार? असा संताप त्यांनी व्यक्त केला.
