Sachin Sawant: टिपू सुलतानला विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा…सचिन सावतांची पुराव्याची मालिका, असा घेतला खरपूस समाचार

Sachin Sawant on BJP over Tipu Sultan Controversy: राज्यात दोन दिवसांपासून टिपू सुलतानीवरून राजकारण तापले आहे. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद वाढला. मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी तोंडसुख घेतले. सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तर पुराव्याची मालिकाच समोर आणली आहे.

Sachin Sawant: टिपू सुलतानला विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा...सचिन सावतांची पुराव्याची मालिका, असा घेतला खरपूस समाचार
सचिन सावंत ,टिपू सुलतान
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 15, 2026 | 11:24 AM

Sachin Sawant on BJP over Tipu Sultan Controversy: म्हैसूरचा राजा टिपू सुलतान हा पुन्हा एकदा राज्याचा राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरांच्या दालनात टिपूचा फोटो लावण्यात आला आणि वाद उफळला. त्यावरून राजकारण तापले. विविध पक्षाकडून त्याविषयी प्रतिक्रिया समोर आल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर टिपूचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समकक्ष असल्याचा सांगत वाद ओढावून घेतला. त्यांच्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपच नाही तर हिंदुत्ववादी संघटनांनी सपकाळांविरोधात टीकेची झोड उठवली. तर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपच्या दुटप्पीपणावर चिमटा काढला आहे. भाजपने सुद्धा टिपू सुलतानचा सन्मान केल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमधून केला आहे. त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करत पुराव्याची मालिकाच समोर आणली आहे.

सचिन सावंत यांची पोस्ट चर्चेत

काँग्रेस नेते सचिन सावत यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात भाजपने टिपू सुलतान यांच्या नावे रस्ता, पुतळा यासाठी पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरील या पोस्टमधून पुराव्याची मालिकाच समोर आणली आहे. टिपू सुलतान नावाचा विरोध करणाऱ्या भाजपाचा दुटप्पीपणा आणि ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता विकृत धर्मांधतेचे राजकारण खालील पुराव्यानिशी दिलेल्या उदाहरणांवरून उघड होईल, असे त्यांनी या पोस्टच्या सुरुवातीला म्हटले आहे.

२०१२ – अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहाचे नाव “शहीदे वतन शेरे म्हैसूर टिपू सुलतान” ठेवण्याचा ठराव भाजपानेच मांडला. सूचक: माजी महापौर व सध्याचे भाजपाचे अकोला महानगर निवडणूक प्रमुख व माजी महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल.

२०१३ – मुंबईच्या एम/पूर्व वॉर्डातील रस्त्याला “शहीद टिपू सुलतान मार्ग” नाव देण्याच्या भाजपा नगरसेवकाच्या प्रस्तावासाठी भाजपाचे नगरसेवक दुथडी भरून उपस्थित तर होते पण सध्याच्या महापौर रितू तावडे यांचे नाव वर दिसेल बरं

२००१ – अंधेरी (प) येथे “शेरे म्हैसूर टिपू सुलतान” मार्ग नामकरण. भाजपाचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत आणि भाजपा नगरसेवकांच्या मांदियाळीत ठराव एकमताने मंजूर. भाजपा नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी टिपू सुलतान यांच्या कबरीवर जाऊन अभ्यागत वहीत गौरवोद्गार नोंदवले.

२०१७ – कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही टिपू सुलतानाकरिता गौरवोद्गार काढले होते. भाजपाला आधी प्रेम होते पण ध्रुवीकरणाच्या अजेंड्याकरिता आज टिपू सुलतान वाईट झाला या दुटप्पीपणाला काय म्हणावे? आणि हो टिपू सुलतान आपल्या हातात भगवान श्रीरामांचे नाव लिहिलेली अ़गठी घालत होते बरं, अशी पोस्ट सचिन सावंत यांनी केली आहे.