संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांविरोधात फोडला बॉम्ब, म्हणाले, पदाचा गैरवापर करत गुजरातच्या…

साई डोंगरात अनेक वनऔषधी आहेत. विष उतरवणाऱ्या औषधी आहेत. साप चावतो, विंचू चावतो. दमा होतो. तेव्हा लोक विष उतरवण्यासाठी देवळात येतात आणि औषधी घेऊन माणसांचं जीव वाचवतात. आता तिथली झाडं बेदरकारपणे तोडली जात आहे. हा राक्षसीपणा आहे, असा हल्लाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चढवला आहे.

संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांविरोधात फोडला बॉम्ब, म्हणाले, पदाचा गैरवापर करत गुजरातच्या...
rahul narvekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 11:49 AM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात बॉम्ब फोडला आहे. नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करून गुजरातच्या उद्योगपतींना जमिनी मिळवून दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. लवकरच याबाबतचा सविस्तर खुलासा करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच या विरोधात अलिबागमध्ये आंदोलने सुरू झाली आहेत, असा दावाही संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. राहुल नार्वेकर आपल्या पदाचा गैरवापर करून रायगड जिल्ह्यातील जमिनी गुजरातच्या उद्योगपतींसाठी खेचत आहेत. त्याविरोधात आलिबाग तालुक्यात कातकरी समाज आंदोलन करत आहे. उल्का महाजन या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. योग्यवेळी मी त्याची माहिती देणार आहे. नार्वेकरांनी आदिवासी आणि शेतकऱ्यांना जगूच द्यायचं नाही असं ठरवलं आहे का? या महाराष्ट्रातील मराठी माणसाची किती जमीन खाणार? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Loading...

भाजपलाच आई आहे का?

कर्जतमध्ये वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यावरही राऊत यांनी संताप व्यक्त केला. ज्या निर्दयपद्धतीने झाडं कापली आहेत, हे कृत्य मानवी राक्षसच करू शकतो. केंद्र आणि राज्यातील सरकार या बाबतीत मानवी राक्षस आहेत. तुम्ही वृक्षतोड पाहिली असती तर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असतं. झाडांवर निर्दयपणी कुऱ्हाड चालवली. 2503 झाडं तोडली आहेत. 33 हजार झाडं पहिल्या टप्प्यातील तोडणार आहेत. म्हणजे हे साई जंगल नष्ट करणार आहेत. इथून भीमाशंकर जवळच आहे. या जंगलात आदिवासी राहतात. मोदी म्हणतात एक पेड माँ के नाम. कुणाची माँ? कातकऱ्यांनीच लावलेली ही झाडं आहेत. त्यांना आई नाही का? आई फक्त भाजपलाच आहे का? टोरंट कंपनीलाच आहे का? की अदानीलाच आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

लढाई एवढ्यावर थांबणार नाही

गुजरातच्या टोरंट कंपनीला झाडं तोडण्याची परवानगी दिली आहे. अख्खं जंगल त्यांच्या ताब्यात दिलं आहे. राज्यातील जंगलं नष्ट करायची, सह्याद्री पर्वताच्या रांगा नष्ट करायच्या. मेहता आणि शाह यांना द्यायच्या. शेतकऱ्यांनी विरोध केला तर बंदुका रोखाच्या, असा प्रकार सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील हजारो पोलीस ग्रामस्थांना मारण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. ही लढाई एवढ्यावर थांबणार नाही. राज ठाकरे उद्या तिकडे जाणार आहेत. इतर निसर्ग प्रेमी आणि पर्यावरणवाद्यांनी आमच्याशी संपर्क केला आहे, असं राऊत म्हणाले.

पर्यावरण मंत्रालय रद्द करा

आता दुसरीकडे झाडं लावणार म्हणतात. कशी लावणार आहेत? 200 वर्षाची झाडे तोडायची आणि कुठे तरी रोपटी लावणार? जागा कुठे आहे? आरेत 3 हजार झाडे तोडली. तिथल्या वन्यजीवांचं काय झालं? रात्रीच्या अंधारात झाडे तोडली. पक्षी आणि जनावरे रात्रभर आक्रोश करत होती. जेव्हा झाडं तोडली जात होती, तेव्हा हजारो पोपट, मोर यांची घरटी गेली. त्यांचा निवारा गेला. ते रात्रभर काही दिवस तिथे तडफडत होते. या सरकारला लाज वाटत नाही का? त्यांच्या खात्यातील पर्यावरण मंत्रालय रद्द करावं. काही उपयोग नाही. फक्त डील करतात. पैसे खातात. उद्योगपतींकडून झाडं तोडण्यासाठी पैसे खातात, असा हल्लाच त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us