Sanjay Raut : साताबारा कोरा करण्याबाबत संजय राऊतांचे मोठे विधान; का दिल्या बच्चू कडूंना शुभेच्छा?

Sanjay Raut on Saatbara and Loan Waiver : नागपूरमध्ये शेतकऱ्याचा साताबारा कोरा करण्याविषयी मोठे आंदोलन सुरू आहे. उपराजधानीसह मध्य भारताला जोडणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाला आहे. तर इकडे मुंबईत आज बड्या घडामोडींअगोदर संजय राऊतांनी मोठे विधान केले आहे.

Sanjay Raut : साताबारा कोरा करण्याबाबत संजय राऊतांचे मोठे विधान; का दिल्या बच्चू कडूंना शुभेच्छा?
संजय राऊत
| Updated on: Oct 30, 2025 | 11:07 AM

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कालपासून शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, शेतकरी नेते राजू शेट्टी, अजित नवले, रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी आणि अपंग बांधव यांनी रस्त्यावर ठिय्या दिला आहे. उपराजधानीसह मध्य भारताला जोडणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाला आहे. तर इकडे मुंबईत आज बड्या घडामोडींअगोदर संजय राऊतांनी मोठे विधान केले आहे.

तर बच्चू कडूंचे स्वागत

जोपर्यंत कर्जमाफी आणि साताबार कोरा करण्याविषयी सरकार ठोस भूमिका जाहीर करणार नाही. तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू कडूंनी जाहीर केली आहे. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. कडू हे लढवय्ये नेते आहेत. मनोज जरांगे हे आपल्या मागण्या मान्य करून मुंबईतून परत गेले. बच्चू कडूंना आता साताबारा कोरा करण्यात जर यश मिळालं तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू. कारण सातबारा कोरा करणं आणि कर्जमाफी या संज्ञा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या असल्याचा दावा त्यांनी केला. साताबारा कोरा झालाच पाहिजे यासाठी संघर्ष सुरू आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी जाहीर केली होती. आताही त्या पद्धतीने कर्जमाफी व्हायला हवी ही आमच्या सर्वांचीच भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.

क्रिकेट हा ऑल पार्टी बोर्ड असल्याचा भ्रम

एमसीए ही राजकारण आणि राजकारण्यांपासून दूर ठेवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही एमसीए पदाधिकारी आणि क्रिकेट जगतातील दिग्गजांनी याविषयी साकडे घातले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशलतेचे राऊतांनी कौतुक केले. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. क्रिकेटमध्ये राजकारणी घुसल्याचे ते म्हणाले. एकेकाळी चांगले क्रिकेटर्स आणि चांगले प्रशासक एमसीएमध्ये होते. गेल्या काही दिवसांमध्ये एमसीएच्या क्रिकेटर्सचा बाजार झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की पडद्यामागच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावं. भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम शरद पवार यांनी केल्याचे राऊत म्हणाले. त्यानंतर अनेकांचे डोळे क्रिकेटकडे वळले. भाजपचा आणि क्रिकेटचा तसा संबंध आला नव्हता. पण गेल्या तीन ते चार वर्षात तो वाढला आहे. प्रत्येकाला असं वाटतंय की क्रिकेट हा ऑल पार्टी बोर्ड आहे, अशी टीका राऊतांनी केली.

सत्याच्या मोर्चाबाबत आज बैठक

1 नोव्हेंबर रोजी सत्याच्या मोर्चा निघणार आहे. त्यापूर्वी आज विरोधी पक्षांची दुपारी 12:30 वाजता बैठक होणार असल्याची माहिती राऊतांनी दिली. आजच्या बैठकीला शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह इतर अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मोर्चाविषयी रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक होत असल्याचे त्यांनी सांगितले.