Sanjay Raut: काँग्रेसला इतकंच सांगायचं की…विधान परिषदवरून वाद उफाळताच संजय राऊतांकडून खरमरीत कान उघडणी, ग्यानबाची मेखही सांगितली

Sanjay Raut on Congress: संजय राऊतांनी विधान परिषद निवडणूक उमेदवारीवरून काँग्रेसला चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी मोठ्या भावाचे कान टोचले आहे. तर त्याचवेळी आगामी राजकारणातील ग्यानबाची मेखही सांगितली आहे.

Sanjay Raut: काँग्रेसला इतकंच सांगायचं की...विधान परिषदवरून वाद उफाळताच संजय राऊतांकडून खरमरीत कान उघडणी, ग्यानबाची मेखही सांगितली
संजय राऊतांनी काँग्रेसचे टोचले कान
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 11:06 AM

Sanjay Raut on Congress: विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव काल जाहीर केले. त्यानंतर काँग्रेसने त्यावर नाराजी व्यक्त केली. तर उद्धव ठाकरे नसतील तर काँग्रेस उमेदवार देणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद वादळी ठरली. त्यांनी काँग्रेसला ग्यानबाची मेख काय हे सांगत चांगलेच सुनावले. राष्ट्रीय पक्षाचं वर्तन कसं असावं आणि त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या हक्काचं रक्षण कसं करावं याविषयी त्यांनी काँग्रेसला उपदेश दिला.

प्रत्येक वेळी काँग्रेसच्या मनात शंका

प्रत्येक वेळेला काँग्रेसच्या मनात काही शंका असतात. राज्यसभेलाही शरद पवार यांच्या नावाबाबत त्यांना शंका होत्या. पण त्यांनीच अगोदर पाठिंबा दिला आणि ते ठपका कायम आमच्यावर ठेवतात. आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांनी त्यांच्या जागी शिवसेनेने विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं की आपली संख्या तुटपुंजी आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला वाटप करुन घ्यावं लागेल. राज्यसभा शरद पवार यांना गेली. विधान परिषद ही शिवसेनेला गेली. पुढील विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी, अशा प्रकारची चर्चा होऊ शकते. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. मला काल काँग्रेसने विचारलं की आम्हाला काय मिळू शकतं? आम्हाला काहीच मिळत नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाला आम्हाला वारंवार सांगायचं आहे की आम्ही दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्तरावर तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत. परवाच्या डिलिमिटेशनच्या बिलाला काँग्रेसने विरोध केला. हे विधेयक नामंजूर झाले. मोदींचा पराभव झाला. त्यात आमच्या पक्षाचे 9 खासदार हे काँग्रेससोबत होते, याची आठवण राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेतून काँग्रेसला करून दिली.

प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर डल्ला मारू नका

2029 साली जर संधी प्राप्त झाली तर काँग्रेसचाच पंतप्रधान होणार आहे. त्याला प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा असेल. त्यामुळे राज्याराज्यातील प्रादेशिक पक्ष हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण तयार करणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य आहे असे मी मानतो. महाराष्ट्रात अथवा पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हक्कावर तुम्ही डल्ला मारू नका, असा सणसणीत टोलाही संजय राऊत यांनी काँग्रेसला हाणला. उद्धव ठाकरे यांच्या शब्दात ,मोठं व्हिजन ठेवा. आम्हाला या देशात नेतृत्व परिवर्तन करायचं आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान असावा अशी आमची भूमिका आहे. अशावेळी विधान परिषद अथवा इतर पदासाठी आपल्या मित्र पक्षांशी संघर्ष होऊ नये ही शिवसेनेची, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. कदाचित अशीच भूमिका काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांची असू शकते, असे मत त्यांनी मांडले.

काँग्रेसशी चर्चा करणार

काँग्रेसशी आम्ही चर्चा करू. काँग्रेससोबत आमचे संबंध अत्यंत मधुर आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे असतील वा स्थानिक नेते असतील. संबंध चांगले आहेत. ठीक आहे, त्यांची नाराजी आम्ही समजू शकतो. तरीही चर्चेतून मार्ग निघेल. दोन वर्षांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक होणार आहे. त्यावेळी संजय राऊत हे सुद्धा निवृत्त होत आहे. पण या सर्व गोष्टी त्यावेळी पाहू, असे सांगत काँग्रेसला पुढे संधी असल्याची ग्यानबाची मेखही उलगडून दाखवली. शिवसेना हा महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यानंतर काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी आहे. प्रत्येकानं आपापल्या भूमिका वठवल्या पाहिजेत, असे राऊत म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us