एकच विधेयक दोनदा कसं मंजूर होईल? महिला आरक्षण विधेयकावरून संजय राऊत यांचा सवाल
संजय राऊत यांनी महिला आरक्षण विधेयकाच्या पुन्हा मांडणीवर देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. 2023 मध्येच हे विधेयक मंजूर झाले असताना, ते पुन्हा कसे मंजूर होईल, असा सवाल त्यांनी केला. भाजप महिला आरक्षणावर ढोंग करत असून खोटारडेपणा करत असल्याचा आरोप राऊतांनी केला.

महिला आरक्षण विधेयक 2023मध्ये मंजूर झालं आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं जोरदार कौतुक केलं होतं. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याचं ऐतिहासिक काम मोदींशिवाय कुणीच करू शकत नाही, असं फडणवीस यांनी तेव्हा म्हटलं होतं. मग जर महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर झालेलं आहे, तर तेच विधेयक पुन्हा का आणलं जात आहे? एकच विधेयक दोनदा कसं मंजूर होईल? असा सवाल करतानाच फडणवीस हे आता दिल्लीत जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीतील घडामोडींवर लक्ष ठेवलं पाहिजे, असा टोलाही ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं पाहिजे. विरोधक या आरक्षणावरून दुटप्पी वागत आहेत, असं म्हटलं होतं. त्यावर मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा टोला लगावला. दुटप्पी कोण वागतंय? हा प्रश्न फडणवीस यांनी स्वत:ला विचारला पाहिजे. महिला आरक्षणाबाबत दुटप्पी कोण? हा प्रश्न फडणवीस स्वत:ला विचारला पाहिजे. त्यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. त्यांना दिल्लीत जायचं आहे. त्यांनी केंद्रात काय घडलं आणि काय नाही घडलं याबाबत सजगता दाखवावी लागेल. महिला आरक्षणाला कुणीही विरोध केला नाही. त्याबाबत ढोंग, नौटंकी आणि खोटारडेपणा कोण करत असेल तर भाजप करत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
त्या बिलाची अंमलबजावणी करा
2023 रोजी फडणवीस यांनी एक ट्विट केलं होतं. आणि महिला आरक्षण बिल संसदेत मंजूर झाल्याबद्दल मोदी आणि शाह यांचं अभिनंदन केलं होतं. 2023 ला बिल मंजूर झालंच आहे. तेच बिल परत आणून तुम्ही कुणाला मूर्ख बनवत आहात? देवेंद्रजी, मोदी जी, शाह जी अमूक जी तमूक जी, असं म्हणत फडणवीस यांनी हातभर ट्विट केलं होतं. त्यानंतरची फडणवीस यांची भाषणं बघा. केवळ ढोलताशे वाजवून नाचायचे बाकी होते. 2023 ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झालंय. त्या विधेयकाची अंमलबजावणी करा. त्यात त्यांनी डीलिमिटेशन बिल टाकलंय. ते संविधानाच्या विरोधात आहे. एकच बिल महिला आरक्षणाचं दोनदा कसं मंजूर होईल? कानातील बोळे काढा. चष्म्याचा नंबर काढून घ्या. सर्जन नसेल तर आम्ही पाठवू. अट्टाहास कसला? हा मूर्खपणा आहे. खोटं बोलत आहेत, असं राऊत म्हणाले.
आता कुणाला जबाबदार धरणार?
अमरावतीच्या रुग्णालयात तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक बालकं आगीने प्रभावीत झाली आहेत. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर, आता मुख्यमंत्री हे सर्व काही राहुल गांधी की पंडित नेहरूंमुळे झालं असं म्हणणार आहे? तुमचं राज्य रसातळाला गेलं आहे. एकही खातं चालत नाही. मुलं मारली जात आहे. जाळली जात आहेत. तुम्ही राहुल गांधींशी स्पर्धा करत आहात. कालच्या कार्यक्रमात स्वयंसेवकांची मुलं होती. हाफ पँट घालणारे फुलपँटीत आले. कालचा कार्यक्रम पेड होता, असं राऊत म्हणाले.