आर्मी बोलवा, चिरडून टाका, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; संजय राऊत यांचं थेट आव्हान

मराठी माणूस आणि दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

आर्मी बोलवा, चिरडून टाका, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; संजय राऊत यांचं थेट आव्हान
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2023 | 1:11 PM

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 2 ऑक्टोबर 2023 : शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आला आहे. दोन्ही गटाने मुंबई महापालिकेकडे एक महिन्यापूर्वीच मैदान मिळावं म्हणून अर्ज केला आहे. शिंदे गटाने तर आमच्याकडे पक्ष आणि चिन्ह आहे. त्यामुळे आमचाच पक्ष खरा असल्याने आम्हाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज शिंदे गटाला चांगलंच फटकारलं आहे. आम्हाला चिरडून टाका. आर्मी बोलवा. पण आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल, असं थेट आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. जिथेही शिवसेनेचा दसरा मेळावा होतो तिथे इतिहास होतो. 50-55 वर्षापासून आम्ही दसरा मेळावा घेतोय. आता हे बेईमान लोक त्यावर दावा सांगत आहेत. शिवसेनेची, मराठी माणसाची ताकद कमी करणं हेच आहे. हे षडयंत्र आहे. शिवसेनेच्या समोर शिवसेनेच्या लोकांचं आव्हान उभं केलं जात आहे. तुम्ही कितीही आव्हानं द्या, रॅली होणारच आणि ही रॅली शिवतीर्थावरच होणार. तुमच्या सत्तेने आम्हाला चिरडण्याचं काम केलं, दिल्लीतून आर्मी बोलावली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. रॅली होणारच आणि तीही शिवतीर्थावरच, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

काय होतंय ते पाहा

मराठी माणसांना मुंबईत घरे नाकारली जात आहे. त्यांची घरे बळकावली जात आहेत. याकडे लक्ष वेधताच त्यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. एकनाथ शिंदे आणि भाजप याला जबाबदार आहे. मराठी माणसांची गळचेपी करता यावी म्हणून शिवसेना फोडली. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज दाबला गेला पाहिजे.

मुंबईवरील मराठी माणसाचं वर्चस्व संपवलं पाहिजे त्यासाठी शिवसेनेला भाजने तोडलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत फुटलेले लोक या प्रकाराला जबाबदार आहेत. आम्ही याची दखल घेतली आहे. येणाऱ्या काळात काय होईल ते पाहा, असंही राऊत म्हणाले.

सावरकरांच्या पुतळ्याजवळ का गेले नाही?

सावरकर देशभक्त होते. देशप्रेमी होते. गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्याचं नेतृत्व केलं. त्यामुळेच जी-20च्यावेळी मोदी सर्वांना घेऊन राजघाटावर गेले होते. आम्ही त्यावेळी तुम्ही सावरकरांच्या पुतळ्याजवळ का गेले नाही? अशी विचारणा केली. सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यावरही जी-20चे नेते का नेले नाही? असं विचारलं होतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

सत्य देशातून गायब

आज गांधीजींची जयंती आहे. गांधींजींचं आपण स्मरण करतो. त्यांनी देशासाठी जे काम केलं त्याला आपण विसरू शकत नाही. ते सत्याचे पुजारी होते. पण देशातून सत्य गायब झालं आहे. सत्याची पुनर्रस्थापना करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. 2024च्या निवडणुकीत ते दिसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.