मणिपूर, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

| Updated on: Aug 06, 2023 | 10:39 AM

भिडे यांच्या या विधानाचे विधानसभेतही पडसाद उमटले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. बाळासाहेब थोरात यांनीही ही मागणी लावून धरली होती.

मणिपूर, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : देशात मणिपूरसह काही राज्यांमध्ये दंगली होत आहेत. मणिपूरमध्ये तर गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. परवा तर संतप्त जमावाने जवानांचा शस्त्रसाठाच पळवून नेला. त्यामुळे या भागातील वातावरण तापलं आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा कट सुरू आहे. पण महाराष्ट्रात दंगली होणार नाही. राज्यातील जनता सूज्ञ आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते.

मणिपूर, राजस्थान, हरियाणा आण दिल्लीच्या सीमेवर दंगली घडवण्यात येत आहे. काही ठिकाणी झाल्या आहेत. महाराष्ट्रात तशा दंगली घडाव्या म्हणून देवेंद्र फडणवीस, भाजप आणि त्यांचं गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहे. या राज्यात दंगलीची आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनता सूज्ञ आहे. अशा कटकारस्थानाला बळी पडणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

ते तुमच्या हृदयात

तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या आजूबाजूला बसला आहात. ज्यांना तुरुंगात टाकायला निघाला होता, ते तुमच्या खिशात आहे. तुमच्या हृदयात आहे. त्यांच्या मांडिला मांडी लावून बसला आहात, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

पूजा करत बसा

महात्मा फुले, महात्मा गांधी आणि साई बाबा यांचं महाराष्ट्र घडवण्यात योगदान आहे. त्यांच्यावर असं विधान करणं विकृती आहे. एखादी व्यक्ती अशा पद्धतीने विधान करत असेल तर सरकारने त्याच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली पाहिजे. ते तुमचे गुरुजी असतील तर तुम्ही त्यांची पूजा करत बसा, असा टोला राऊत यांनी लगावला.

राऊत यांचा निशाना का?

शिवप्रतिष्ठानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा फुले, महात्मा गांधी आणि साईबाबांविरोधात अत्यंत हिनपातळीवरचं विधान केलं होतं. त्यामुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यभर मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेंविरोधात आंदोलन सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भिडे यांचा निषेध नोंदवला आहे.

भिडे यांच्या या विधानाचे विधानसभेतही पडसाद उमटले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्या अटकेची मागणी केली होती. बाळासाहेब थोरात यांनीही ही मागणी लावून धरली होती. तर भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं होतं. तसेच फडणवीस यांनी भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा केला होता. त्याला विरोधकांनी आक्षेपही घेतला होता.