एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय; संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल

ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ, शेतकरी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. एक सरकार 'ब्रीक्स'मध्ये व्यस्त आहे, तर दुसरं लंडनमध्ये 'वडापाव' खाण्यात मग्न आहे, असं म्हणत राऊत यांनी सरकारला धारेवर धरले.

एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी, दुसरं लंडनमध्ये वडापाव खातंय; संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 11:11 AM

मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी हतबल झाले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना वाऱ्यावर सोडलं आहे. या दोन्ही प्रश्नांकडे पाहायला सरकारला वेळ नाहीये. कारण एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी आहे. तर दुसरं सरकार लंडनच्या रस्त्यावर वडापाव खात फिरत आहे, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला आहे. मराठवाड्यात कोरडा दुष्काळ आहे. परिस्थिती चिंताजनक आहे. सोयबीन आणि अन्य पिकं जळून गेली आहेत. 60 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला, पाण्याचा थेंब पडला नाही. दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. लोकांच्या मनात खदखद आहे. दोन्ही प्रश्नावर सरकार काहीच करत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी

उद्धव ठाकरेंनी केलेली कर्जमाफी आणि आजच्या सरकारने केलेली कर्जमाफी यात जमीन अस्मानचा फरक आहे. एखाद्या गावात एकालाही कर्जमाफी झाली नाही, असं काल शेतकरी सांगत होते. एक सरकार लंडनच्या रस्त्यावर वडापाव खातंय. एक सरकार ब्रीक्समध्ये बिझी आहे. तर तिसरं महिला सरकार… त्यांना महाराष्ट्रात काय चाललं माहीत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

सामान्य ज्ञान नसेल तर…

यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरूनही टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येत आहेत. मुंबईत गणेशोत्सव आहे. या काळात मुंबईत गर्दी असते. गृहमंत्र्यांना कळायला पाहिजे. मुंबईत आल्यावर सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडेल हे त्यांना जर कळत नसेल, साधं सामान्य ज्ञान नसेल तर कठिण आहे. त्यांच्यासाठी मुंबईत चार चार रस्ते बंद करतात. अख्ख्या दिल्लीला या माणसाने हैराण केलं आहे. यांच्या बंगल्याबाहेरचे चार रस्ते बंद असतात. साडे पाचशे पोलिसांचा ताफा घेऊन ते फिरतात. त्यांच्या ताफ्यात 28 गाड्या असतात. मुंबईतील गाड्या वेगळ्या असतात. कोण मारतं यांना? असं काय काम केलं यांनी? धोका दोनच व्यक्तींना असतो अंडरवर्ल्डचे गँगस्टर आणि हुकूमशाहांना. पोलीस कामात गुंतले आहेत. असं असताना ते मुंबईत येत आहेत. लायब्ररीत जाण्यासाठी. काय वाचणार आहेत? असा सवाल त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us