
मुंबईतील सावली बारने राज्याच्या राजकारणात वादाचा बार उडवला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्याच नावावर हा बार आहे. त्यावरून एकच खळबळ उडाली. कदमांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी लावून धरली आहे. त्यानंतर आता सावली बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच अजून एक घडामोड समोर येत आहे.
नियमांचा भंग, ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द
मुंबईतील सावली बारमधील ऑर्केस्ट्राची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ही मान्यता पोलिस देतात.नियमांचा भंग झाल्याने ही मान्यता पोलिसांनी रद्द केल्याचे समोर आले आहे. या बार मध्ये जेवण आणि मद्य सेवा देण्यास दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. बारवर कारवाई झाल्यावर उत्पादन शुल्क नियमानुसार १५ दिवस ते २ महिने बार पुर्णतः बंदचे आदेश काढले जात आहेत. यानुसार बार ची पुर्ण मान्यता रद्द होणे हा प्रक्रिया अजून पूर्ण झाली नसून बारचा गुमास्ता, अन्न औषध परवाना, मद्य परवाना हे अजुन रद्द झाले नसल्याचे समोर आले आहे.
परबांकडून आरोपांची राळ, परवाना परत
अनिल परब यांनी आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर रामदास कदम यांनी सावलीमधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत घेतला होता. परबांकडून काल कांदिवलीतील समतानगर पोलिसांची भेट घेतली होती. राज्य सरकारच्या दबावाखाली पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. जर वेळीच कारवाई केली नाहीतर आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला. त्यानंतर रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत घेण्यात आला.
योगेश कदमांचा राजीनामा केव्हा?
चोर चोरी करुन गेला तरी त्याच्यावर काहीच कारवाई होत नसल्याचे घणाघात आमदार अनिल परब यांनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याप्रकरणात हतबल दिसत असल्याचा आरोप परब यांनी केला. मंत्री पदावर असताना आपण काहीही करु शकतो, हा त्यांचा माज असल्याचे परब म्हणाले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याचे ते म्हणाले. माणिकराव कोकाटे, योगेश कदम, संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा त्यांनी केली.