धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात कमबॅक? एका वाक्यात मुख्यमंत्र्यांनी असा विषय संपवला, म्हणाले काय?
Devendra Fadnavis on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांच्ये मंत्रिमंडळात कमबॅक होणार का? असा सवाल गेल्या दोन दिवसांपासून विचारण्यात येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलानंतर चर्चांना वेग आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मग अशी प्रतिक्रिया दिली.

माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मोठे गंडांतर आले. त्यांचा जवळचा माणूस खून, अपहरणासारख्या क्रूर कृत्याचा मास्टरमाईंड निघाला. इतके कमी होते की काय, त्यांच्या मागे कृषी खात्यातील घोटाळ्याचे बालंट लागले. एकामागून एक आरोपांची राळ उडत गेली आणि पुढे आरोग्याची तक्रार पुढे आली. त्यात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. आता ते पुन्हा एकदा सक्रिय दिसले. गेल्या दोन दिवसात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामुळे ते पुन्हा मंत्रिमंडळात दिसतील अशी अटकळ सुरू झाली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीच थेट स्पष्टीकरण दिले आहे.
माणिकराव कोकाटे यांना अखेर ओसाड गावची पाटीलकी, रमीच्या डावात सोडावी लागली. त्यांना क्रीडा खात्याचा पदभार देण्यात आला आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्या खाद्यांवर कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्रिमंडळात हे फेरबदलाचे वारे सुरू असतानाच धनंजय मुंडे यांच्या एंट्रीने राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली. धनंजय मुंडे हे पुन्हा मंत्रिमंडळात दाखल होतील, असा संदेश आपसुकच माध्यमात पसरला. दादांसोबत आणि नंतर मुख्यमंत्र्यांसोबतच्या त्यांच्या खलबतांनी मग वेग घेतला.
दमानियाच नाही तर धसांचा विरोध
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर या प्रकरणी तीव्र हरकत घेतली. तर दुसरीकडे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा सरकारविषयी वेगळा संदेश जाईल असे स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांना कृषी खात्यातील घोटाळ्यासंदर्भात नुकतीच हायकोर्टातून क्लीनचीट मिळाली. त्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित मानण्यात येत होता. त्यांना परत मंत्रिमंडळा घेण्याविषयी दादांनी पण सकारात्मक भूमिका मांडली. त्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनावर शिक्कामोर्तब झाले. त्यातच त्यांनी अजितदादा आणि फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते.
एका वाक्यात संपवला विषय
धनंजय मुंडे यांनी तीनवेळा आपली भेट घेतली. तीनदा ही वेगवेगळ्या विषयावर ही भेट झाली. त्यांच्यासोबतच्या कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाविषयीची चर्चा आपण, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे करतो, असे त्यांनी ठणकावले. त्यामुळे धनुभाऊंसाठी सध्या वेट अँड वॉचची स्थिती तर नाही ना, अशी चर्चा होत आहे.
