Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभेवर? विलिनीकरणाआधीच मोठी घडामोड, ठाकरेसेना-काँग्रेस मदत करणार?

Sharad Pawar back in Rajya Sabha: राज्यसभेच्या सात जागांसाठी आता राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीला सहा आणि महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावं लागणार आहे. त्यातच शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा मानस व्यक्त होत आहे. पडद्याआड काय घडामोडी घडत आहेत?

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभेवर? विलिनीकरणाआधीच मोठी घडामोड, ठाकरेसेना-काँग्रेस मदत करणार?
शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Feb 14, 2026 | 10:55 AM

Sharad Pawar back in Rajya Sabha: अजितदादांचे अपघाती निधन, सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी, त्यांची राज्यसभेतील रिक्त जागा, राष्ट्रवादीचे विलिनीकरण अशा घाडमोडीत अजून एक बातमी समोर येत आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी राजकीय वातावरण तापले आहे. शरद पवार हे 2 एप्रिल 2026 रोजी निवृत्त होत आहेत. विधानसभेत महायुतीचे पारडे जड आहे. महाविकास आघाडी एकत्रित येऊन राज्यसभेची एक जागा निवडून आणू शकते. त्यामुळे या जागेसाठी शरद पवार यांच्या नावावर पुन्हा शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेसेना आणि काँग्रेस शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत अनुकूल आहे.

विधानसभेतील संख्याबळ काय?

शरद पवार यांच्यासह त्यांच्याच गटाच्या परभणीच्या खासदार फौजिया खान, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार आहेत. हे सर्व निवृत्त होत आहेत.

तर 2024 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे 131, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 57, अजित पवार पक्षाचे 40 असे महायुतीचे एकूण 228 आमदार आहेत. अपक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर महायुतीचे सहा खासदार निवडून जातील. यामध्ये भाजपचे चार तर मित्र पक्ष शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक खासदार निवडून जाईल.

पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी?

अजितदादांच्या अकाली निधनाने पक्षाची आणि त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्यावर आली आहे. त्यांनी राज्यसभेची खासदारकीचा राजीनामा दिला आहे. ही जागा रिक्त आहे. या जागेवर पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर राज्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चाही सुरू आहे. जर दोन्ही पक्ष एकत्र आले तर महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्यसभेवर पार्थ पवार की शरद पवार यांच्या पैकी कुणाला पाठवण्यात येईल हा जरतरचा विषय आहे.

काँग्रेस-ठाकरेसेनेचा पाठिंबा

तर दुसर्‍या शक्यतेनुसार, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा बारगळला आहे. त्यामुळे शरद पवार हे महाविकास आघाडीचे राज्यसभेत नेतृत्व करतील. आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी एक जागा महाविकास आघाडी निवडून आणेल आणि त्यासाठी शरद पवार यांच्या नावाबाबत त्यांनी संकेत दिले आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे. त्यासाठी शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.