‘पप्पू’ म्हणून टिंगल-टवाळी करणं मोदींना महागात: शरद पवार

'पप्पू' म्हणून टिंगल-टवाळी करणं मोदींना महागात: शरद पवार


मुंबई: “पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतची नाराजी जनतेने मतातून व्यक्त केली. भाजपवर जनता नाराज आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पप्पू म्हणून टिंगल टवाळी करणं योग्य नव्हतं. ही परिवर्तनाची सुरुवात आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांनी भाजप आणि मोदींच्या आक्रमक प्रचारावर टीका केली.

शरद पवार म्हणाले, “भाजपच्या साडेचार वर्षांच्या आक्रमक प्रचाराला जनतेने नकार दिला आहे. सर्व सभांमध्ये मोदी एकाच कुटुंबावर हल्ले करत होते. नव्या पीढीने नेहरु, इंदिरा, राजीव गांधी पाहिले नाहीत, मात्र सोनिया, राहुल गांधींना पाहिलं, त्यांच्यावरील वैयक्तिक हल्ला जनतेला पटला नाही. राहुल गांधींची पप्पू म्हणून टिंगल टवाळी करणे योग्य नव्हते. मोदींबाबतची नाराजी जनतेने मतातून व्यक्त केली”

भाजपने पैशाचा अमाप वापर केला, मात्र त्याचा परिणाम मतदारांवर झाला नाही. ही परिवर्तनाची सुरुवात आहे, असं शरद पवार म्हणाले.

पाच राज्यांच्या निवडणुकीचे जे निकाल आले, त्याबद्दल समाधान आहे. भाजपला पर्याय देण्यासाठी काँग्रेसची महत्वाची भूमिका आहे. शिवाय अन्य पक्षाची भूमिकाही महत्त्वाची आहे. समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बसपा यांनी यूपीएसोबत यावं अशी आमची इच्छा आहे. इतर पक्षांना मर्यादा आहेत, असंही पवारांनी नमूद केलं.

ज्यांनी स्वायत्त संस्थांवर हल्ले करण्याची भूमिका अवलंबली, त्यांना जनतेने पसंत केले नाही. रिझर्व्ह बँक ही महत्वाची संस्था आहे, त्यावर सुद्धा मोदी सरकारने हल्ला चढवला. देशात कधी नव्हे ते चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे मोदी राज्यात काळजीचं वातावरण आहे, असं पवार म्हणाले.

भाजपची भूमिका शेतकरीविरोधी आहे. छोटे व्यापारीसुद्धा विरोधात आहेत, असं पवारांनी सांगितलं.

शिवसेना आणि भाजप एकत्र राहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. शिवसेना शेवटपर्यंत भाजपला ठोकत राहील, याबद्दलही माझ्या मनात शंका नाही, असा टोमणा पवारांनी लगावला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI