शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीत राहणार की बाहेर पडणार? संजय राऊत यांच्या त्या विधानाने खळबळ

डीलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळा सूर लावल्याने शरद पवार इंडिया आघाडीत राहणार की नाही, यावर चर्चा सुरू झाली आहे. यावर संजय राऊत यांनी 'पवारांची राष्ट्रवादी अजून इंडिया आघाडीत आहे आणि ते राहतील' असे सूचक विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राऊत यांच्या 'अजून' या शब्दाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

शरद पवारांची राष्ट्रवादी इंडिया आघाडीत राहणार की बाहेर पडणार? संजय राऊत यांच्या त्या विधानाने खळबळ
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2026 | 11:18 AM

केंद्र सरकार पुन्हा एकदा डीलिमिटेशन बिल संसदेत मांडणार आहे. या विधेयकाला पाठिंबा मिळावा म्हणून भाजपने जुळवाजुळव सुरू केली आहे. विरोधी पक्षातील काही पक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी डीलिमिटेशन विधेयकावरून वेगळा सूर लावला आहे. त्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी इंडिया आाघाडीत राहणार की इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं एक विधान आलं आहे. पवारांची राष्ट्रवादी अजून इंडिया आघाडीत आहे आणि ते राहतील, असं राऊत यांना सांगावं लागलं आहे. राऊत यांनी ‘अजून’ हा शब्द वापरल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

खासदार संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे यांच्या डीलिमिटेशनवरील भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. सुप्रिया सुळे इंडिया आघाडीत राहणार का? असा सवालही करण्यात आला. त्यावर राऊत यांनी सूचक विधान केलंय. इंडिया अलायन्स सर्व एकत्र आहे. तीन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे या सोनिया गांधी यांच्या पुस्तक प्रकाशनाला आल्या होत्या. म्हणजे त्या अजून इंडिया ब्लॉकमध्ये आहेत. आणि त्या राहतील, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राऊत यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

Loading...

हा खाजवण्याचा विषय नाही

आमचा डीलिमिटेशनला तात्त्विक विरोध आहे. हे विधेयक लोकशाहीसाठी घातक आहे. निर्घृणपणे मतदारसंघ तोडले जाणार आहेत, त्याला आमचा विरोध आहे. 500च्यावर खासदार दिल्लीत येतील. तेव्हा बाजार होईल. त्याला आमचा विरोध आहे. हा भाजपचा विषय नाही. राष्ट्रीय विषय आहे. अमित शाह चार फंटर घेऊन बसले आणि सूचना केल्या असं होत नाही. ते आतापर्यंत शरद पवार यांची एनसीपी आणि द्रमुकशीच बोलले का? काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. समाजवादी पार्टी त्यानंतरचा मोठा पक्ष आहे. त्यांचे 41 खासदार आहेत. टीएमसी आहे. त्यांच्याशी का बोलत नाही? आमच्याकडे तीन खासदार आहेत. आमच्याशी का चर्चा होत नाही? हा राष्ट्रीय विषय आहे. त्यावर तुम्ही बोललं पाहिजे. फक्त एनसीपी आणि द्रमुकशी बोललं म्हणजे झालं नाही. हा राष्ट्रीय मुद्दा आहे. हा भाजपचा खाजवण्याचा मुद्दा नाही. एकटेच दिवसभर खाजवत बसले असं होत नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

शुद्ध इंग्रजीत मोदी उत्तरे देतील?

काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन भारताचा अपमान करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावरूनही राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. भाजपच्या आरोपाने देश चालतो का? मोदी परदेशात जाऊन अपमान करतात ते चालतं का? राहुल गांधींना अमेरिकेच्या विद्यापीठाने बोलावलं आहे. त्यांचे विचार तिथल्या विद्यार्थ्यांना ऐकायचे आहेत. त्यामुळे ते जातात. हवं तर मोदींनाही पाठवा. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तरे द्यायला सांगा. मोदी देऊ शकतात का उत्तरे? राहुल गांधीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तरे देऊ शकतात. शुद्ध इंग्रजीत विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला तर मोदी उत्तर देणार का? असा सवाल करतानाच देशाची अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे. हे सांगायला राहुल गांधींची गरज नाही. सर्व दिसत आहे, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us