शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारला धरणार धारेवर, येत्या 12 ऑक्टोबर रोजी थेट… नवा इशारा काय?
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला तरी शेतकऱ्यांना मदत जाहीर न केल्याने राष्ट्रवादीने सरकारला नवीन इशारा दिला आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास समृद्धी महामार्ग रोखणार, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. मदत किती मिळणार याचा आकडाही दिलेला नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने सरकारला नवीन इशारा दिला आहे. 12 ऑक्टोबरच्या आधी शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर समृद्धी महामार्ग रोखण्यात येईल, असा इशाराच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या या इशाऱ्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये सरकार शेतकऱ्यांबाबत काही तरी योजना आणि मदत जाहीर करेल अशी आशा आहे. पुढच्या आठवड्यातही कॅबिनेट होणार आहे. या दोन कॅबिनेटमध्ये मदत जाहीर झाली नाही तर पुढच्या 12 दिवसात म्हणजे 12 ते 15 ऑक्टोबर रोजी आम्ही समृद्धी मार्ग अडवणार आहोत. 12 तारखेच्या आधी मदत नाही झाली तर शेतकरी आणि मजूर समृद्धी महामार्ग अडवणार आहेत, असा इशाराच रोहित पवार यांनी दिला आहे.
नियोजन काटसरीने, मदत मोठ्या मनाने…
यावेळी रोहित पवार यांनी कमी दुष्काळी तालुके दाखवल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली. सरकारकडून दुष्काळग्रस्त तालुक्यांची नावे जाहीर झाली आहेत. केंद्र सरकारच्या वेबसाईटमध्ये डायरेक्ट सांगितलं की, महाराष्ट्रातील 290 तालुक्यात दुष्काळाची गंभीर अवस्था आहे. तरीही सरकारने कमी दुष्काळी तालुके दाखवले आहेत. कोल्हापुरात जिथे पाऊस जास्त पडला त्या गावाचं नाव या यादीत आहे. जिथे पाऊस कमी पडला त्या गावाला वगळलं आहे. नाशिकमधील अनेक गावेही यादीतून वगळली आहेत. जामखेडमध्येही पाणी टंचाई आहे. हा एक दोन तालुका किंवा गावांचा विषय नाही. राज्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे. सरकारने काटकसरीने नियोजन करावं. विकास कामात काटकसर करावी. पण मदत देताना मोठ्या मनाने द्यावी, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.
खूप अभ्यास करू नका
मुख्यमंत्री खूप अभ्यास करतात. त्यामुळे सरकारने अभ्यास न करता आकडे द्यावेत. कमी अभ्यास करावा. अटी टाकू नका. सर्वांना सरसकट मदत द्या, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. रोजगार हमीचे पैसे, जमीन खरडून गेली त्याचे सर्व पैसे दिवाळीत द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
80-90 हजार कोटींचं पॅकेज द्या
शेतकऱ्यांना 80-90 हजार कोटींचं पॅकेज द्यावं लागणार असल्याचंही रोहित पवार म्हणाले. राज्यात सध्या सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरणीच संकट ओढवलेलं आहे. माझ्या कर्जत जामखेड मतदार संघात फक्त 40 टक्के पाऊस पडला आहे आणि 60 टक्के पावसाची कमतरता आहे. सोयाबीन, तूर, मका, कापूस, भात आणि इतर पिकांच्या संदर्भात शेतकऱ्यांचा झालेला खर्च हा उत्पन्नातून निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली गेली आहे. शेतकऱ्यांचं 35948 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. संपूर्ण विदर्भात 22456 कोटी रुपयांच नुकसान झालं आहे. भाजपचे बहुतांश नेते विदर्भातील येतात आणि त्यांच्याच भागात इतकं नुकसान झालं आहे. कापूस, सोयाबीन आणि मका ही तीन पीकं पकडून इतकं मोठं नुकसान झालं आहे आणि त्यात अजून फळबाग पकडली गेली नाही. हे फक्त खरीपाचं नुकसान झालं आहे. त्यात रब्बी पिकांच किती नुकसान झालं याची मोजदाद करण्यात आलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.