शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला, सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या, कुणाच्या मांडीवर कोण…
शिंदे गटाने सावरकरांवरील पुस्तकाचा निषेध करताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या घटनेवर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बाळासाहेबांनी ज्यांना राजकारणात ओळख दिली, त्यांनीच असा अनादर करणे निषेधार्ह असून, ही केवळ पदासाठी केलेली कृती आहे, अशी टीका अंधारे यांनी केली.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचा दावा करत शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडून पुस्तकाचा निषेध नोंदवला. हा निषेध नोंदवत असतानाच शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडला गेला. त्यामुळे पुस्तकाचा निषेध नोंदवणं शिंदे गटाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. शिंदे गटाच्या या कृतीचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. बाळासाहेबांनी ज्यांची वर्षा आणि सह्याद्रीवर वावरण्याची पत निर्माण केली, तेच लोक आज बाळासाहेबांचा फोटो फाडत असून हे निषेधार्ह आहे, असा संताप सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. त्या टीव्ही9 मराठीशी बोलत होत्या.
या लोकांना ऐकावं अशा योग्यतेचे ते नाहीत. त्यामुळे मी त्यांची पत्रकार परिषद पाहिली नाही. पण त्यानंतरची घटना संतापजनक आहे. मला आताच त्याबद्दल कळलं. ज्या लोकांचा संबंध कायम कमिशनखोरी, दलाली, टेंडर आणि टक्केवारीत गेला आहे. खोक्याशी आला आहे. त्यांना वाचन संस्कृती कळणार नाही. त्यांना पुस्तकं आणि पुस्तकातील विवेकनिष्ठ विचार कळणार नाही. ज्यांना वाचन संस्कृती कळते, पुस्तके कळतात ती लोकं पुस्तकं फाडत नाहीत. हा पराकोटीचा द्वेष आणि तिरस्कार आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
एनसी बाई एखादं पद मिळवण्यासाठी…
दिल्लीतील बापाने यांना स्क्रिप्ट पाठवली आणि यांच्या नेत्याने आपल्या ब्रिगेडसमोर ती ठेवली. चला भुंकायला सुरुवात करा. आपल्या बापाकडून स्क्रिप्ट आलीय. नाही तर आपलं पक्ष चिन्ह जाईल, असं फर्मान या ब्रिगेडला बजावण्यात आलं. पण भुंकताना यांना कळलं नाही, त्यांच्या लक्षात आलं नाही, ज्या बाळासाहेबांमुळे यांची औकात तयार झाली. गल्लीबोळात वावरणाऱ्यांना वर्षा आणि सह्याद्रीवर वावरण्याची पत वाढली. त्या बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहोत, एवढं भान नसेल तर कठिण आहे. एनसी बाई एखादं पद मिळवण्यासठी कोणत्या लेव्हलला जाऊ शकतात, किती गलिच्छ राजकारण करू शकतात हे दिसून येतं, असा हल्लाच अंधारे यांनी चढवला.
त्यांच्याच मांडीला मांडी…
ठाकरेंचा पक्ष काँग्रेसच्या मांडीवर बसल्याचा आरोप शायना एनसी यांनी यावेळी केला होता. त्यावरही अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. मला बोलायला भाग पाडू नका. कोण कोण कुणाच्या मांडीवर बसतंय? बसलंय आणि बसतंय हे बोलायला भाग पाडू नये. मी अत्यंत विवेकनिष्ठ विचार मांडणारी आहे. माझ्यावर अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत नेतृत्त्वाचे आणि कुटुंबीयांचे संस्कार आहे. पण 70 हजार कोटीचा आरोप केलेल्या माणसासोबत पाट लावून घ्यायचा आणि त्यांच्याच हाताने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायचं, ज्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही, असं म्हणून राजीनामे दिले, त्यांच्याच मांडीला मांडी लावून कार्यक्रमात बसायचं हे असले उद्योग आम्ही केले नाही. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. मी संयमी नेतृत्वासोबत काम करत आहे. त्यामुळे मला बोलायचं नाहीये, असं त्या म्हणाल्या.
पुस्तक वाचायचं माहीत आहे का?
या लोकांना पुस्तक वाचायचं माहीत आहे का? व्हॉट्सअपवरच्या गरजू कार्यकर्त्याचा मेसेज हे लोक वाचत नाहीत. यांना फक्त टेंडरचे कागद वाचणं माहीत आहे. त्यांनी पुस्तकावर काय बोलावं? आयत्या स्क्रिप्टवर काम करणारे हे लोक आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.
