
शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील पाच मंत्र्यांची एसआयटी चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी करा, त्यामध्ये संजय राठोड, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, उदय सामंत यांच्यासह पाच जणांची नावे आहेत, असे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट यांचा व्हिडिओ मार्फ केला आहे, असा आरोप ते करत आहेत, त्यासंदर्भात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात येणार आहे. त्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, तो व्हिडिओ मार्फ केला की काय केले, ते फॉरेन्सिक लॅब ठरवणार आहे. त्यासंदर्भात विधानसभेत वक्तव्य येऊ द्या, असे त्यांनी म्हटले.
राऊत यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. त्याचे सोहळे भाजकडून साजरे केले जात आहे. परंतु त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील वस्तूंना जागतिक वारसाचा दर्जा मिळाला नाही का? तुम्ही ते किल्ले बांधले आहेत का? यासंदर्भात राजकारण करु नका, असे संजय राऊत यांनी भाजपला म्हटले आहे.
मुंबई लुटली जात आहे. मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार केले जात आहे. मराठी माणसाला येथून हाकलले जात आहे. मुंबई तोडण्याचे कारस्थान आहे. धारावी त्याचे उदाहरण आहे. आज उद्धव ठाकरे असते तर त्यांनी धारवीतील प्रकल्पाला स्थगिती दिली असती. त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे. धारावीच्या निमित्ताने मुंबईत भूखंड घोटाळा झाला आहे. भ्रष्टाचारास मुक्त रान देणारे जे जे प्रकल्प होते, त्यालाही आम्ही स्थगिती दिली असती. शक्तीपीठ महामार्गालाही आम्ही स्थगिती दिली असती. हा रस्ता अदानी यांच्यासाठी तयार होत आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळालाही आम्ही स्थगिती दिली असती. कारण हे सर्व प्रकल्प अदानी यांच्यासाठी केले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केले.